गिरणगावात भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचा उत्साह
गिरणगावात भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचा उत्साह
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग-परळ विभागात गुढी पाडव्याच्या स्वागतार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले. या शोभायात्रेस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने आणि मराठी नववर्षाचा प्रारंभ या दिवसापासून होत असल्याने या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीविष्णूंच्या रामावताराची विजयगाथा आणि अयोध्येतील विजयोत्सवाची परंपरा जपत, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, लेझीम पथके आणि आकर्षक रांगोळ्यांनी शोभायात्रा सजली होती.
सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मठ (परळ वर्कशॉप) येथून प्रारंभ झालेल्या शोभायात्रेने परळ नाका, नरे पार्क, भारतमाता सिनेमा, लालबाग मार्केट, जयहिंद सिनेमा मार्गे सणसवाडी येथे समारोप केला.
या प्रसंगी यशवंत जाधव (मा. अध्यक्ष स्थायी समिती बृहन्मुंबई महानगरपालिका शिवसेना), प्रा. डॉ. मनिषा कायंदे विधान परिषद सदस्य सचिव व प्रवक्त्त्या-शिवसेना), रत्ना रघुनाथ महाले (मा. नगरसेविका अध्यक्षा-महिला तालुका विभाग वरळी विधानसभा), डॉ. सतिश वैरागी (अध्यक्ष-कोकण विभाग), राजीव काळे (मा. अध्यक्ष रायगड सहकारी बँक), डॉ. विजय पवार (सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ) आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच, शोभा यात्रेतील नागरिकांना एक हजार पेनाचे वाटप करण्यात आले.व सहभागी समाज बांधवांना पर्यावरणपूरक कापडी पिशवी, उच्च दर्जाचे आकर्षक पेन, अल्पोपहार व पाणी यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे ललित चरित्र ग्रंथ भेटस्वरूप देण्यात आले. संस्कार भारतीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळी रेखाटून शोभायात्रेची शोभा वाढवली.
शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर, दिलीप गणपत खोंड, किशोर मेहेर, डॉ. सतिश वैरागी, दत्ताजी कहाणे, देवीदास राऊत, यशवंत महाडीक, प्रशांत मधुकर कसाबे, रुपाली अनंत मावळे, यांनी अथक परिश्रम घेतले.
या भव्य शोभायात्रेमुळे हिंदू नववर्षाच्या स्वागताला विशेष रंगत आली. उपस्थित नागरिकांनी या अनोख्या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला आणि आगामी वर्षांतही अशीच उत्साही शोभायात्रा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत