गुढीपाडवा हा एक भारतीय सण
गुढीपाडवा
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.त्याचबरोबर आणखी एक धार्मिक कथा देखील सांगितली जाते. ती म्हणजे, प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले, त्यांच्या या विजयानंतर त्याचे जंगी स्वागत अयोध्येत करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक घरावर गुढी उभारली गेली. अन् तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दिवस आहे, अशी भावना देखील लोकांची आहे.
याव्यतिरिक्त अजून एका पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन याने हूणांचा पराभव करून आपले राज्य स्थापन करून शालिवाहन शक सुरु केले. त्यादिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून हा दिवस गुढीपाडवा दिवस व हिंदू नववर्षांचा पहिला दिवस मानला जातो.गुढीपाडव्याचा इतिहास सांगतो की मराठ्यांचे सर्वात शक्तिशाली राजा शिवाजी महाराज यांनी या दिवशी युद्धात आपल्या शत्रूचा पराभव केला. परत येताना त्यांचे लोक त्यांच्या दारा आणि खिडक्यांमधून मराठा ध्वज फडकावत होते. म्हणूनच, या दिवशी त्यांच्या घराबाहेर ध्वज लावण्याची प्रथा सुरु झाली.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.
लेखक-श्रीराम महाजन कलाशिक्षक
चेंबूर कर्नाटका हायस्कूल. चेंबूर. मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत