कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग
कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग
लेवाजगत क्रीडा न्युज:- संघाला यशाचा मार्ग दाखवण्यासाठी कर्णधाराला पुढे येऊन नेतृत्व करावं लागतं. याशिवाय कधी-कधी सहकारी खेळाडूंना संधी देण्यासाठी त्यागही करावा लागतो. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवसोबत घडला. या मालिकेदरम्यान त्यानं संघासाठी एक बलिदान दिलं, जे आता मास्टर स्ट्रोक ठरलं आहे!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं यजमानांचा 3-1 असा पराभव केला. पहिल्या दोन सामन्यांनंतर, मालिका 1-1 ने बरोबरीत होती. त्यानंतर तिलक वर्माला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यासाठी सूर्यकुमार यादवनं आपल्या तिसऱ्या क्रमांकाचा त्याग केला. यानंतर या क्रमांकावर खेळताना तिलकनं दोन शतकं ठोकून कर्णधाराचा विश्वास सार्थ केला.
सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवनं खुलासा केला होता की, स्वतः तिलक वर्मानं त्याला नंबर-3 साठी विचारले होतं. कर्णधार म्हणाला, “मी तिलक वर्माबद्दल काय बोलू? दुसऱ्या टी20 सामन्यानंतर तो माझ्या खोलीत आला आणि त्यानं मला विचारले की तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो का? मी त्याला सांगितलं की आज त्याचा दिवस आहे आणि त्यानं त्याचा आनंद घ्यावा. मला माहित आहे की तो किती सक्षम आहे. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. तो भविष्यात नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. मालिकेदरम्यान कर्णधाराला त्याची जागा मागितल्यानंतर तिलक वर्मावर धावा करण्याचं दडपण होतं. मात्र या युवा खेळाडूनं हे दडपण चांगल्या प्रकारे हाताळलं आणि मालिकेत सर्वाधिक 280 धावा केल्या.
तिलक वर्मानं सेंच्युरियनमध्ये 56 चेंडूत 8 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 107 धावांची खेळी केली होती. तर जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी20 मध्ये त्यानं नाबाद 120 धावा केल्या. या दोन्ही सामन्यात सामनावीर ठरण्याबरोबरच तो मालिकावीरही ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत