झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था झाशी-उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या भयंकर दुर्घटनेमध्ये १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात ही आग लागली. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून सविस्तर तपास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मिडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रात्री १० च्या सुमारास ही आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एकीकडे आग विझवण्याचं काम चालू असताना दुसरीकडे आगीत सापडलेले इतर नवजात अर्भकं व रुग्णांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात काही काळ मोठी गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
आई-वडिलांचा टाहो, रुग्णालयावर संताप!
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या नवजात अर्भकांच्या आई-वडिलांनी रुग्णालयाबाहेर टाहो फोडल्याचं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य शुक्रवारी रात्री झाशी शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाबाहेर निर्माण झालं होतं. “मेरा बच्चा मरा है” असं म्हणत एक व्यक्ती आपल्या चिमुकल्याच्या मृत्यूवर ओक्साबोक्शी रडत असल्याचं रुग्णालयाबाहेरचं विदारक दृश्य या अर्भकांच्या मातापित्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसं ठरत होतं.
आगीचं कारण काय?
दरम्यान, रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागातील आतल्या वॉर्डमध्ये प्रामुख्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचं सांगितलं जात असून त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “अतिदक्षता विभागातील बाहेरच्या वॉर्डमधल्या सर्व अर्भकांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र, आतल्या वॉर्डमध्ये असणाऱ्या १० अर्भकांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक रुग्णांनाही वाचवण्यात यश आलं आहे”, अशी माहिती झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पोस्ट
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. “ही दुर्दैवी घटना काळीज पिळवटून टाकणारी आणि प्रचंड वेदना देणारी आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत”, असं आदित्यनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी अर्थात मे २०२४ मध्ये दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील लहान मुलांच्या रुग्णालयातही अशाच प्रकारची आग लागण्याची घटना घडली होती. रुग्णालयाच्या नवजात अर्भकांसाठीच्या अतीदक्षता विभागातच ही आग लागली होती. या सहा नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत