ट्रॅव्हल्स चालकाची एसटी चालकाला मारहाण
ट्रॅव्हल्स चालकाची एसटी चालकाला मारहाण
लेवाजगत न्युज अमळनेर:-
बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई कोंढावळ चेक नाक्याजवळ दि. २६ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बस डेपोत चालक असलेल्या भटू निळकंठ पाटील (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ रोजी सायंकाळी पुणे येथून चोपडा एसटी बस (क्र. एमएच ०९ ईएम ९६५३) घेवून निघाले होते. २६ रोजी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास फागणे जवळ बस जात असताना पुढे असलेल्या विनोद ट्रॅव्हल्सला (बस क्र. एमएच ०९ सीव्ही २७०९) ओव्हरटेक करत असताना सदर ट्रॅव्हल्सचालकाने साईड न देता जोरात गाडी पुढे घेतली. समोरून ट्रक असल्याने एसटी चालक भटु पाटील यांना अचानक ब्रेक मारावा लागला.
त्यामुळे उभा असलेला एक प्रवासी खाली पडला. सदर ट्रॅव्हल्स चोपडाई कोंढावळ चेक पोस्टजवळ उभी असताना बसचालक भटू पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालकाला तू साईड का दिली नाही अशी विचारणा केली असता सदर चालक दैवत वाल्मीक पाटील (रा. जळोद) याला राग आल्याने त्याने बसच्या दरवाज्याला लाथा मारत बसचालक भटू पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व माझ्या नादी लागला तर नोकरी खावून टाकेल अशी धमकी दिली.
यावेळी प्रवासी व वाहक यांनी भटू पाटील यांची सोडवणूक केली. त्यावरून भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत