फैजपूर येथिल जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" साजरा
फैजपूर येथिल जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" साजरा
लेवा जगत न्यूज फैजपूर-येथिल जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेज येथे १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
देश शक्तिशाली होण्यासाठी डॉ. कलाम म्हणत, विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. अवांतर वाचनाने मिळणाऱ्या संदर्भामुळे व्यक्तिगत/व्यक्तिमत्त्व आणि भाषा विकास हे उद्दिष्ट साध्य होते. लेखन-भाषणातून व्यक्त होणारे सकारात्मक, प्रगल्भ विचार सर्वांच्याच मुख्यतः युवापिढीच्या मुलांमध्ये चैतन्य, आशावाद आणि प्रेरणा निर्माण करीत होते. मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचे बीज पेरत होते.
डॉ. कलामांनी सदैव आपल्या कृतीतून समाजाला प्रेरणा दिल्याने ते देशाचे आदर्श ठरले. त्यांच्या मोठेपणाचे बीज वाचनात दडले आहे. आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणाऱ्या डॉ. अब्दुल कलामांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी यांनी डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांनी सतत वाचनाचा ध्यास धरावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा सुधाकर गोसावी होते. त्यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच वाचन हे आयुष्य यशस्वीपणे जगण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे हे विविध उदाहरणे देऊन विषद केले. मराठी, हिंदी तसेच इंग्रजी साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की एक दर्जेदार पुस्तक सुद्धा जीवनाची दिशा पूर्णपणे बदलऊ शकते म्हणून विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया वर जास्त वेळ वाया न घालवता वाचन करायला पाहिजे कारण वाचनानेच माणसाचे जीवन समृद्ध होत असते. विद्यार्थ्यांनी ग्रंथांना आपले मित्र बनवावे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला तसेच अभ्यासाव्यतिरिक्त विविध अग्रलेख, मासिके यांचे वाचन विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई. चौधरी, प्रा वाय आर भोळे,डॉ डी ए वारके, प्रा डी आर पाचपांडे, प्रा. ओ.के.फिरके, प्रा मोहिनी चौधरी तसेच सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत