Header Ads

Header ADS

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी-लेखक पंकज पाटील

 

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी- लेखक पंकज पाटील

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी- लेखक पंकज पाटील 

    ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ असे म्हटले जाते. श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक होत. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार आहेत.

   चक्रधर स्वामींचा जन्म सन ११९४ मध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला झाला. ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार असलेले श्री चक्रधर स्वामींना लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणूनही इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत. 

   श्रीचक्रधरांचा कालखंड (इ. स. ११९४ ते १२८२) हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. त्या काळात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. त्यामुळे खरा धर्म बाजूला पडला होता. कर्मकांडांतून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्रीचक्रधरस्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे. जातिनिरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्त्वे आहेत.

   महाराष्ट्रात त्यावेळी देवगिरीच्या यादवांची कारकीर्द होती. समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात चक्रधरांनी आपल्या द्वैती तत्त्वज्ञानाचा प्रसार करत चातुर्वर्ण्यावर हल्ला चढविला. त्यांनी आपल्या पंथात स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय अशा सर्वांनाच संन्यास घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत-जनभाषेत सांगण्याचा प्रयत्न केला.




  श्री चक्रधर हे ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभू या परमेश्वरावताराचे ते शिष्य. चक्रधरांचे मूळचे नाव हरपाळदेव असून त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला अशी कल्पना आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषिक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला.

   श्री चक्रधर स्वामी म्हणतात 'महात्मेनी चतुर्विधाभूतामा अभय देयावे'. अर्थात जगात अस्तित्वात असलेल्या सर्वांना भीतीतून मुक्तता म्हणजेच अभय द्यावे कारण भीतीच सर्व प्रकारच्या गुलामीचे मूळ आहे. म्हणूनच कोणीही व्यक्ती महानुभाव धर्म स्वीकारून त्यानुसार आचरण करू शकत असे. चातुर्वर्ण्यासह स्त्रिया आणि अतिशूद्रांना मुक्त प्रवेश दिल्याने जाती-धर्मातून आलेली कनिष्ठत्वाची भीती चक्रधर स्वामींनी दूर केली. यावरून चक्रधर स्वामींचे कृतिशील तत्त्वज्ञान मानवी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचे होते, हे स्पष्ट होते. श्रीचक्रधर स्वामी अहिंसेचे पूजक तसेच जातीयतेचे कट्टर विरोधक होते. 

   श्रीचक्रधर स्वामी आपल्या अनुयायांना ते आचारधर्माचे कठोरपणे पालन करायला लावत असले तरी कोमल अंत:करणाचे होते. केवळ माणसांविषयीच नव्हे, तर प्राणिमात्रांविषयीही त्यांना ममत्व वाटे. आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे त्यांना वाटे.

   चक्रधर स्वामींनी अनेक दृष्टान्त सांगितले आहेत. त्यांचा ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ प्रसिद्ध आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे, हे प्रस्तुत लीळेतून त्यांनी पटवून दिले आहे. प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही परंतु आपले मन वाईट विचारांपासून दूर ठेवले पाहिजे. तसेच आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांचा गर्व बाळगणे हा देखील एक विकारच आहे असे स्वामी सांगत. अचारधर्म समजवण्यासाठी चक्रधर स्वामींनी आपल्या अमोघ वाणीतून असे अनेक दृष्टान्त असे काही मांडले आहेत की वाचतांना तो प्रसंग अपल्यासमोरच घडत असल्याची अनुभूती येते. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींना कोटी कोटी नमन.

...पंकज वसंत पाटील

मलकापूर जि. बुलढाणा

मो.9850430579

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.