Header Ads

Header ADS

फडणवीस,महाजनांवर एकनाथ खडसे संतापले ;म्हणाले रक्षा खडसे निवडून येईपर्यंत मी चांगला होतो मग त्या जिंकल्यानंतर माझ्या प्रवेशाला विरोध का

 

Fadnavis-was-angry-at-Mahajan-Eknath-Khadse-said-I-was-good-until-Raksha-Khadse-was-elected-then-why-opposed-my-admission-after-winning-it-

फडणवीस,महाजनांवर एकनाथ खडसे संतापले ;म्हणाले रक्षा खडसे निवडून येईपर्यंत मी चांगला होतो मग त्या जिंकल्यानंतर माझ्या प्रवेशाला विरोध का

वृत्तसंस्था मुंबई-आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या कथित भाजप प्रवेशाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या वरिष्ठांनी पक्षाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी मला भाजपत येण्याची विनंती केली. त्यांनी रक्षा खडसे यांना निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार मी त्यांना मदत केली. त्या निवडून येईपर्यंत मी चांगला होतो, पण निवडणूक आल्यानंतर मात्र माझ्या प्रवेशाला विरोध केला गेला, असे ते फडणवीस व महाजन यांच्यावर संताप व्यक्त करताना म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये परतण्याची घोषणा केली होती. आपला पक्षप्रवेश दिल्लीत होणार असल्याचे ते म्हणाले होते. पण त्यांचा बहुप्रतिक्षित भाजप प्रवेश अद्याप झाला नाही. अखेर त्यांनी या विलंबाला देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन हे भाजपचे दोन नेते जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण आजही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात असल्याचेही स्पष्ट केले आहे.

   एकनाथ खडसे मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पण प्रदेशाध्यक्षांनी तो अद्याप स्वीकारला नाही. मी स्वतःहून भाजपकडे प्रवेश देण्याची विनंती केली नव्हती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भाजपत येण्याची विनंती केली होती. त्यामुळे भाजपत जाण्याचा विषय आला होता.

  भाजपश्रेष्ठींच्या विनंतीनुसार मी त्यांच्याकडे विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला. त्यांनी मला वेळ कशाला? आत्ताच प्रवेश करा असे सांगितले. मी तेव्हा दिल्लीतच होतो. त्यानंतर मी विनोद तावडे व रक्षा खडसेंसह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात मफलर घालत माझा प्रवेश झाल्याचे सांगितले. पण नंतर त्या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांनी विरोध केला. यामुळे माझा भाजपप्रवेश रखडला, असे एकनाथ खडसे म्हणाले.

  एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन या राज्यातील दोन नेत्यांची नावे घेतली. ते म्हणाले, लोकसभेची निवडणूक होती. त्यात भाजपची स्थिती नाजूक असल्याचा सर्व्हे आला होता. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळावी यासाठी वरिष्ठांनी मला भाजपत येण्याची विनंती केली होती. रक्षा खडसे निवडणुकीत उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना मदत करण्याचे आवाहन भाजपातून मला करण्यात आले होते. त्यानुसार मी त्यांना मदत केली. त्या निवडून येईपर्यंत मी चांगला होतो. पण निवडून आल्यानंतर मात्र माझ्या प्रवेशाला विरोध झाला. यासंदर्भात गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीसांकडून विरोध होऊ शकतो. गिरीश महाजनांनी यावर अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  भाजपच्या काही लोकांनी आम्ही त्यांना म्हणजे मला साथ देणार नाही अशी भूमिका घेतली. ज्या माणसाने ४० वर्षे घाम गाळून भाजप उभी केली, हे आत्ता बोलणारे माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. या सगळ्यांना राजकीय जीवनात मी बळ देण्याचे काम केले. पण आज तेच काही कारणाने माझा विरोध करत आहेत. हरकत नाही, मीही काही भाजपत जाण्यासाठी फारसा उत्सुक नव्हतो. पण नड्डा यांच्यापेक्षा राज्यातील भाजपचे नेते मोठे आहेत असे मला वाटते, असेही एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.