Header Ads

Header ADS

श्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती; महिलेची हत्या, बॉडीचे ३० हून जास्त तुकडे करुन फ्रिजमध्ये


 श्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती; महिलेची हत्या, बॉडीचे ३० हून जास्त तुकडे करुन फ्रिजमध्ये


लेवाजगत न्युज बेंगळुरू:-नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करून देणारी खळबळजनक घटना बेंगळुरू शहरात उघडकीस आली आहे. एका २९ वर्षीय महिलेची राहत्या घरात हत्या करून, तिच्या मृतदेहाचे ३०हून अधिक तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बेंगळुरूत मल्लेश्वरम भागात उघडकीस आला आहे. महालक्ष्मी असे या महिलेचे नाव असून एका बेडरूमच्या या घरात ती एकटी राहत होती. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.


पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त एन. सतीशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यालिकवल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका घरात एका महिलेचा मृतदेह तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.’

येथील पाइपलाइन रोडजवळ वीरन्ना भवन इमारतीत ही घटना उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी महालक्ष्मी हिच्या नातेवाइकांना कळवले. शनिवारी महालक्ष्मी हिची आई आणि बहीण यांनी तिथे येऊन घरात प्रवेश केला, तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली.


पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेड लावून बंद केला. श्वानपथक; तसेच फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. ही महिला मूळची कर्नाटकाबाहेरील होती, मात्र राज्यात स्थायिक झाली होती, अशी माहिती कुमार यांनी दिली. ती पश्चिम बंगाल किंवा छत्तीसगडमधील असल्याची माहिती देण्यात आली.


महालक्ष्मी ही पतीपासून विभक्त, एकटीच राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. ती एका मॉलमध्ये काम करत होती. तर, तिच्या पतीचे नाव राणा असल्याचे; तसेच शहरापासून दूर काम करीत असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच तो घटनास्थळी दाखल झाला. मागील पाच-सहा महिन्यांपासून महालक्ष्मी या घरात राहत होती. ती शेजारी कोणामध्ये फारशी मिसळत नव्हती. काही दिवस तिचा भाऊ तिच्यासोबत राहत होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.


बेंगळुरूतील या घटनेमुळे सन २०२२मधील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येच्या घटनेची स्मृती समोर आल्या. लिव्ह-इन जोडीदार आफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.