‘धर्मवीर-‘२’चे प्रदर्शन लांबणीवर का पडले?
‘धर्मवीर-‘२’चे प्रदर्शन लांबणीवर का पडले ?
लेवाजगत न्यूज मुंबई-‘धर्मवीर’ चित्रपटाच्या श्रृखंलेतील ‘धर्मवीर-२’ चे प्रदर्शन राज्यभर कोसळत असलेल्या पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आल्याचे नुकतेच या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी जाहीर केले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला शिवसैनिकांनी दोन वर्षांपूर्वी भरभरून प्रतिसाद दिला होता. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष पटवून देणारा ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मोठ्या राजकीय घडामोडींची पायाभरणी करणारा ठरल्याने ‘धर्मवीर-२’च्या निमित्ताने होणारी वातावरणनिर्मितीही सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असे असताना ९ ॲागस्ट रोजी राज्यभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख थेट २७ सप्टेंबर अशी ठरविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि ‘धर्मवीर-२’चे लांबलेले प्रदर्शन याचा एकमेकांशी संबंध आहे का, अशी चर्चाही यानिमीत्ताने सुरू झाली आहे.
शिंदे यांच्या राजकीय रणनीतीचा भाग?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गाजलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटाची निर्मिती ही त्यांच्या व्यापक राजकीय रणनीतीचा भाग होता का याविषयीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू असते. आनंद दिघे हे शिंदे यांचे राजकीय गुरु. एकनाथ शिंदे व्यक्तिगत आयुष्यात मोठ्या संकटांना सामोरे जात असताना त्यांना वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर काढत त्यांचा राजकीय पाया मजबूत करण्यात आनंद दिघे यांनी निर्णायक भूमिका बजावली. ठाणे जिल्हा आणि शिवसेना हे अनेक दशकांचे वेगळे राजकीय समीकरण राहिले आहे. एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा ‘दाखविला’ तो आनंद दिघे यांनी. दिघे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना शिंदे यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमधील राजकीय मोहिमा सोपविल्या जात. त्यातूनच शिवसेनेचे संघटन आणि त्यातील खाचखळगे शिंदे यांच्या अंगवळणी पडत गेले. पुढे शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले आणि नंतर आमदार, मंत्री. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा पाया हा नेहमीच आनंद दिघे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील ऐतिहासिक बंडापूर्वी ‘धर्मवीर’ प्रदर्शित होणे हा काही योगायोग मानला जात नाही. शिंदे यांच्या राजकीय व्यूहरचनेचा तो एक भाग मानला जातो.
निवडणूक वर्षात ‘धर्मवीर-२’ आणि शिंदे…
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या महायुतीला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार हे स्पष्टच आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यात कोण सरस ठरते याविषयीची राजकीय उत्सुकता अजूनही कायम आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेला नऊ तर शिंदेसेनेला सात जागा मिळाल्या असल्या तरी विजयाच्या टक्केवारीत शिंदेसेना सरस ठरली. मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात या दोन पक्षांत पुढील काळातही जोरकस सामना होताना दिसेल. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा गड आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या १८ जागा आहेत. शिवसेनेतील बंडाचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांना या जिल्ह्यात बसला आहे. त्यामुळे याठिकाणी विजय मिळविण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्यापुढे असणार आहे. या जिल्ह्यात अजूनही आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विजयानंतर विधानसभेतही अशाच निकालांची पुनरावृत्ती करण्याची तयारीत शिंदे आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांचे वलय आपल्यामागे उभे राहावे असा शिंदे यांचा अजूनही प्रयत्न असणार आहे. ‘धर्मवीर-२’ त्यामुळे शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरेल असे त्यांच्या समर्थकांना वाटते.
‘धर्मवीर-२’चे प्रदर्शन लांबणीवर का?
‘धर्मवीर-२’चे प्रदर्शन कधी करायचे यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात खूप आधीपासून वेगवेगळ्या पद्धतीची आखणी केली जात असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल अशी चर्चा होती. मात्र लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित केला जावा असे शिंदे यांच्या गोटात ठरले आणि लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीतही या चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरूच राहिले. लोकसभा निवडणुकाीचे निकाल जाहीर होताच ‘धर्मवीर-२’च्या प्रदर्शनाची लगबग मुख्यमंत्र्यांच्या गोटात सुरू झाल्याचे दिसले. त्यानुसार या चित्रपटाचा टिझर, प्रदर्शनाची मांडणी मोठ्या झगमगाटात करण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे चित्रपट तारे यासाठी बोलविण्यात आले. याच दरम्यान राज्यभर मोठा पाऊस झाला आणि चित्रपट प्रदर्शनाची तारीख (९ ॲागस्ट) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस कमी होताच चित्रपट प्रदर्शित होईल असेही ठरले. असे असताना आता चित्रपट प्रदर्शनाची तारीख थेट २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास सव्वा महिना हे प्रदर्शन का पुढे ढकलण्यात आले याविषयी आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
निवडणुकाही लांबणीवर?
‘धर्मवीर-२’ चित्रपटाचे प्रदर्शन सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्यामागे निवडणुकांचा हंगामही उशिरा सुरू होण्याचे कारण असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर लागेल अशी एक शक्यता व्यक्त होत होती. आता हा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे सरकेल असेही बोलले जाते. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवानंतरच हा चित्रपट प्रदर्शित केला जावा असे ठरल्याने अखेरचा आठवडा निश्चित करण्यात आल्याचे या प्रक्रियेतील मंडळी सांगत आहेत. असे असले तरी इतकी सगळी तयारी होऊनही सप्टेंबर महिन्याचा अखेरचा आठवड्यापर्यंत प्रदर्शन लांबणीवर टाकण्यामागे लांबलेल्या निवडणुका हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
विश्लेषण:लोकसत्ता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत