भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली !
जळगांव जिल्हयातील भाविक देवदर्शनासाठी नेपाळ येथील पशुपतिनाथला जात असतांना शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत त्यांची बस कोसळली. उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथून निघालेली ही बस नेपाळमधील पोखराहून काठमांडूला जात होती. या भीषण अपघातात बसमधील ४३ पैकी २८ जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी आहेत.
हृदय हे लावून टाकणाऱ्या या घटनेतील मृतांना ही काव्यांजली!
देवा, केवढे हे क्रौर्य!
लेवा पाटील, समाज बांधव खान्देशची ही लेकरे
निघाली नेपाळी देवदर्शना घेऊन सर्व सगे-सोयरे
हसत-खेळत मौजमजेत चालले देश पर्यटनाला
असाकसा मृत्यूदेवाने घातला अचानक घाला
भक्तीभावाची हजारो स्वप्ने होती त्यांच्या मनी
गुन्हा त्यांचा काय देवा सांगेल का मज कुणी?
उराउरी देवा भेटण्यां मनात अपरिमित आस
बस रूपाने यमरेड्याचा पडला अचानक फास
ओळखले नाही कुणीही त्या यमरेड्याच्या रूपाला
कसा अचानक रूप बदलून, बस होऊन तो आला
संकटकाळी म्हणतात सर्वदा देव तारी भक्ताला
तारक तारक म्हणता म्हणता मारक कसा झाला
की अति प्रेमाने बोलाविले भक्ता प्रत्यक्ष भेटीला
मार्ग भेटीचा हा असा निवडला काय म्हणावे तुला
लहानथोर नात्यांचाही देवा तू विचार नाही केला
क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासम संसार कोसळला
मोक्ष देशी मानवा सोडून माया मोह नि सर्व भाव
काय साधीशी परंतु देवा हा मोडून अर्ध्यावर डाव
जन्म म्हणजे मृत्यू अंतिम सत्य माहीत आहे मला
एकसाथ परंतु अनेक मरावे देवा न्याय हा कुठला
लहानमोठे अनघ जीव घेता कीव ना आली तुला
बळी पडले अकाली तुझ्या भेसूर मृत्यू तांडवाला
पाप पृथ्वीवर वाढले म्हणून का मृत्यूतांडव केले?
भोळ्याभाबड्या भक्तांचे परी तू आयुष्यच संपविले
कष्ट करून भक्तजन येती, प्रवास हजारो मैलांचा
सांग देवा का धरावा लोभ आम्ही अशा दर्शनाचा
ज्याचे त्याचे दैव वेगळे म्हणून का रे चूप बसावे
एक साथ परी दुर्दैव सगळ्यांचे एकच का असावे?
हृदय फाटले रक्त आटले ऐकून ही दुःखद वार्ता
का म्हणावे देवा तुला भोळ्या भक्तांनी विघ्नहर्ता?
महादेव नाव मोठे असता केलेस तू केवढे छोटे
की तुझ्या दर्शना निघालो हे भावच आमचे खोटे?
संहाराची देवता तू जरी नाव तुझे पशुपतिनाथ
किती जणांना आज अचानक केलेस तू अनाथ
देवच जर असा वागला दैत्यांनीही करावा हेवा
सांग ईश्वरा कसा जपावा भक्तांनी भक्तीचा ठेवा?
कित्येकांचा जीव घेऊन दाखविलेस तू अती शौर्य
स्वप्ने मिटली आज अचानक, देवा केवढे हे क्रौर्य!
श्रद्धांजली वाहता काळीज तुटले अश्रूंची झाली फुले
शांती मिळो आत्म्यांना म्हणता झाली हृदयाची शकले
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
*©️ सर्व हक्क स्वाधीन*
मोबाईल: 9869073189
ईमेल: arunspatil16@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत