सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज सावदा :- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो. सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल वढोदे प्र. सावदा येथे संस्थेच्या वतीने आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे सर, पर्यवेक्षक- पंकज बोदडे सर, सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला मणिपूर येथील आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत आदिवासी समाजाचे प्रतिनिधिक प्रतिनिधित्व साकारून विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाच्या पारंपारिक वेशभूषेत निषेध व्यक्त करून आपल्या भावना मांडल्या.
यावेळी शाळेतील फलकावरती अग्रभागी बैलगाडी व त्यावरील नांगर, इरली, घोंगडे यांचे चित्र सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. शिक्षकांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न चिमुकले विद्यार्थी करत होते.
यावेळी बोलताना, सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे म्हणाले की, आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेलही मात्र याच आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो. दुर्गम, डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे. आज संपूर्ण देशासह आदिवासी बहुल जळगाव जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येत आहे. सातपुडा पर्वताचे नैसर्गिक सौंदर्य जोपासण्याचे काम इथल्या आदिवासी बांधवांनी केले आहे. देशाची नैसर्गिक साधन संपत्ती अबाधित असण्याचे कारणही आदिवासी समाजच आहे. एकीकडे आधुनिकीकरणाच्या नावाखाली, शहरीकरणाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कत्तल केली जाते. तर दुसरीकडे जंगलाच्या संवर्धनासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हसदेव येथील आंदोलन होय.
यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकमेंकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर, लोकगीते यामध्ये तल्लीन होऊन आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय आदिवासी’’, बिरसा मुंडा की जय’’ “धरती आबा बिरसा मुंडा अमर रहे ” अशा घोषणांनी शाळेचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भालेराव सर, पंकज भालेराव सर, सावन भालेराव सर, कविता बैसाने मॅडम, दिपाली लहासे मॅडम, विक्रम तायडे, कुंदन तायडे, जयदीप मेढे, कशीश भालेराव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक पंकज बोदडे सर यांनी केले. तर आभार शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत