शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग-बदलापूरची पुनरावृत्ती नंदुरबारमध्ये !
शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग-बदलापूरची पुनरावृत्ती नंदुरबारमध्ये !
लेवाजगत न्यूज नंदुरबार-बदलापूरच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता बदलापूर घटनेचीच पुनरावृत्ती नंदुरबार येथे झाल्याचे समोर आले आहे. नंदुरबार येथील एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. याच सोबत शाळेनेही या कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे.
नंदुरबार येथील शाळेत सफाई कामगाराने इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. घडलेल्या घटनेविषयी विद्यार्थिनीने आपला पालकांना सांगितल्यानंतर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बदलापूरसारखीच घटना नंदुरबारमध्ये घडली असल्याने आता पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास देखील सुरक्षित वाटत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य कारवाई करावी, अशी मागणी येथील पालकांनी केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, अशी माहिती नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली.
राज्यात महिलांच्या विरोधात वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीने देखील याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन देखील केले. महिलांच्या तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे. एकंदरीतच राज्यात महिला व मुली आता सुरक्षित नाहीत, विशेष म्हणजे ज्याला विद्येचे मंदिर आपण म्हणतो अशा शाळांमध्ये सुद्धा आपल्या मुली सुरक्षित नाहीत, या पेक्षा आणखी वाईट काय असू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत