रक्षाबंधन-संत राजिंदर सिंह जी महाराज
रक्षाबंधन-संत राजिंदर सिंह जी महाराज
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हिंदूंचा पवित्र सण रक्षाबंधन देशभर साजरा केला जातो. या उत्सवाला पर्शियन भाषेत स्लोनो म्हणून देखील ओळखले जाते. याचा अर्थ वर्षाचा नवीन दिवस.
या दिवशी बहिणी आपल्या बांधवांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या करीता सुख-समृद्धीची कामना करतात की ही राखी प्रत्येक संकटात आणि अडचणीत त्यांचे रक्षण करो. महाराष्ट्रात या सणाच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी नारळ फोडून नवीन कामाचा आरंभ करणे शुभ मानले जाते. पारशी लोक देखील या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि जल देवतांची प्रार्थना करतात.
आपल्या प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक विधींशी नारळाचा संबंध आहे- जन्म-मृत्यू, पूजा-पाठ, विवाह आणि उत्सवात नारळा चे महत्व आहे. या मागील कारण काय आहे? त्याचा आपण कधी विचार तरी केला का? जर आपण नारळाकडे नीट पाहिले तर आपल्याला नारळावर तीन डोळे दिसतील. तिसरा डोळा शिवनेत्राचे प्रतीक आहे, जे दोन डोळ्यांमधील दिव्य चक्षूची आठवण करून देतात. नारळातील गोड पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला त्यात छिद्र करावे लागते. त्याच प्रमाणे आपल्या मध्ये प्रभू साक्षात्कार होण्यासाठी आपल्याला तृतीय नेत्र उघडणे आवश्यक आहे.
उपनयन संस्कार आपल्याला काय सूचित करते? सद्गुरुं कडून अनुग्रह घेतल्यानंतर शिष्याने धारण केलेले जानवे त्याला गुरूंकडून ग्रहण केलेल्या मंत्राची आयुष्यभर आठवण करून देते आणि ते म्हणजे आत्मानुभव आणि प्रभु साक्षात्कार करणे होय. एक समर्थ सद्गुरु ईश्वर प्राप्तीचे ध्येय साध्य करण्यास मदत करतात आणि शिष्यांचे सर्व प्रकारे संरक्षण व पालन पोषण करतात.
बहिण जेंव्हा आपल्या भावाला राखी बांधते, तेंव्हा भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण भावाचे रक्षण कोण करेल? या जीवनात आणि पुढील जीवनात आपले रक्षण करण्यास कोण समर्थ आहे? जीवनातील चढ-उतार आणि संकटांमध्ये केवळ सद्गुरू मदत करतात. सद्गुरु आपल्याला दीक्षा देतात आणि अदृश्य अशा रक्षाबंधनाने प्रत्येक क्षणा क्षणाला आपले संरक्षण करतात. सद्गुरुंकडून दीक्षा घेणे म्हणजे जन्म-मृत्यू चक्रातून मुक्त होऊन जिवंतपणी मोक्षप्राप्ती करणे होय. दया आणि करुणा यांनी परिपूर्ण असलेले आपले सद्गुरु दीक्षेचे वरदान देतात. आपल्या तेजोमय शक्तीने सद्गुरु आपल्याला उन्नत करतात, जेणे करून आपले लक्ष शिवनेत्रावर केंद्रित व्हावे. बायबल म्हणते जर तुमचे दोन डोळे एक होतील तर तुमचे संपूर्ण अस्तित्व उजळून जाईल. समर्थ सद्गुरू आपल्याला सिद्ध मंत्र देऊन आपले मन स्थिर व शांत करतात. आपल्या आत्म्याचे केंद्रस्थान असलेल्या दिव्यचक्षूवर ध्यान केंदित करण्यास पात्र बनवितात.
या बिंदूवर म्हणजे शिवनेत्रावर ध्यान केंद्रित केल्याने आपल्यातील दिव्य मंडलाचा प्रकाश आणि अनहद नाद (दिव्य संगीताचा) अनुभव येतो. आपल्या अंतरातील प्रकाश आणि नाद यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याने आपला आत्मा देहभान हरपून दिव्य मंडलात प्रवेश करतो. या मंडलात आत्म्याचे सद्गुरूंच्या ज्योतिर्मय स्वरूपाशी मिलन होते. जे आत्म्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण मंडला पलीकडील उच्च अध्यात्मिक मंडलात आत्म्याचा ऊर्जा स्त्रोत असलेल्या परमात्म्याकडे घेऊन जातात. ही दिव्य मंडले शांती आणि आनंदाने परिपूर्ण आहेत. शरीररुपी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यावर आपल्या आनंदाला पारावार राहत नाही आणि आपण पक्षाप्रमाणे उच्च अध्यात्मिक मंडलामध्ये भरारी घेऊ लागतो.
दिव्य चैतन्याने युक्त अशा उच्च अध्यात्मिक मंडलात पोहोचल्यावर ग्लानी येते. या ग्लानी मुळे आपल्याला स्वतःचा विसर पडतो, याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. आपल्या आत्म्याचा स्त्रोत असलेल्या परमात्म्याशी मिलन होते. हा आनंद अतुलनीय आणि अवर्णनीय आहे. आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात . हि दैवी आनंदाची, खुशीची अवस्था आहे. हेच आपल्या जीवनाचे मुख्य लक्ष आहे. आत्मिक अनुभव आणि असे रक्षाबंधन आपल्याला कोणत्याही नातेवाइकाकडून मिळू शकत नाही. संत-सद्गुरू जन्म-मृत्यूच्या दुष्टचक्रातून आपल्याला मुक्त करून आपले जीवन सार्थक करतात. अशा प्रकारे सद्गुरु आपले खऱ्या अर्थाने रक्षाबंधन करतात, या जीवनात आणि मृत्यू नंतरच्या पुढील जीवनातही आपले संरक्षण करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत