नेपाळच्या अपघाताग्रस्त बसमधील बहुतांश प्रवाशी वरणगाव व तळवेलचे ! जिल्ह्यात दुःखाचे सावट
नेपाळच्या अपघाताग्रस्त बसमधील बहुतांश प्रवाशी वरणगाव व तळवेलचे !
जिल्ह्यात दुःखाचे सावट
लेवाजगत न्युज जळगाव:-
आज सकाळी नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातातील बहुतांश प्रवाशी हे वरणगाव व तळवेल येथील असल्याची माहिती समोर आल्यामुळे परिसराला मोठा धक्का बसला असून याबाबतच्या मदत कार्यावर ना. रक्षाताई खडसे व आमदार एकनाथराव खडसे हे लक्ष ठेवून आहेत. तर आमदार संजय सावकारे हे तातडीने नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखीलसमोर आली आहे.
नेपाळमध्ये आज शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस (युपी ५३ एफटी ७६२३) या क्रमांकाची होती. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये ४१ प्रवाशांसह चालक व क्लिनर असे एकुण ४३ जण बसमध्ये प्रवास करत होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ताज्या वृत्तानुसार या बसमधील बहुतांश प्रवाशी हे वरणगाव व तळवेल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातील काहीजण हे प्रतिष्ठित कुटुंबातील असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच या संदर्भात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी तातडीने माहिती घेवून मदत कार्यात मदत केली. तर आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील रक्षाताईंसोबत अपघातातील जखमींची व्हिडीओ कॉलवरून विचारपूस केली. तसेच आमदार संजय सावकारे यांनी देखील तातडीने अपघातात जखमी झालेल्यांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधून त्यांना धीर दिला. सुत्रांच्या माहितीनुसार आमदार संजय सावकारे हे तातडीने विमानाने नेपाळ येथे जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत