Header Ads

Header ADS

सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण...'; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका


 सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण...'; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका


लेवाजगत न्युज सावदा:- यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली.  या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले मिळणार आहेत. या योजनेवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरु आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या (Ajit Pawar) 'जनसन्मान यात्रे'नंतर आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झालीये. या यात्रेची पहिली सभा जुन्नरच्या लेण्याद्रीत झाली आहे. या सभेतून रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. 

सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय

रोहिणी खडसे म्हणाल्या की, लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे. तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे.पण त्यांना महिला अद्याप समजल्याच नाहीत.  अशी टीका त्यांनी केली आहे. 

लाडकी खुर्ची योजनेसाठी दिल्ली दरबारी लोटांगण : अमोल कोल्हे

खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे.  त्यांनी म्हटलंय की, लाडकी खुर्ची योजना सुरू आहे, या लाडकी खुर्चीसाठी वाट्टेल तितकी लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरुयेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचं आहे. त्यासाठी ही 'शिवस्वराज्य यात्रा' आपण काढतोय, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.