Header Ads

Header ADS

धक्कादायक! कचरा जाळत असताना अचानक मोठा स्फोट; माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

 

धक्कादायक! कचरा जाळत असताना अचानक मोठा स्फोट; माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू


लेवाजगत न्युज मणिपूर:-एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका बॉम्ब ब्लास्टमध्ये माजी आमदाराच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुर्वैवी घटना मणिपूरमधील (Manipur) कांगपोकली जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकुलचे माजी आमदार यामथोंग हाओकीप यांच्या घराशेजारी हा बॉम्बस्फोट झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार हाओकीप यांची दुसरी पत्नी सपम चारुबाला या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीनं सायकुल येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र, प्राथमिक उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाच्या वेळी माजी आमदार हाओकीप हेही त्यांच्या घरात होते, मात्र ते सुखरुप आहेत, त्यांना या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही.


कंपाउंडमध्ये कचरा जाळताना भयंकर स्फोट

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, प्राथमिक तपासानंतर असं दिसतंय की, 59 वर्षीय सपम चारुबाला शेजारच्या घराच्या आवारात कचरा एकत्र करुन जाळत होत्या. त्याचवेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. सुदैवाची बाब म्हणजे, ज्या घराच्या आवारात चारुबाला कचरा जाळत होत्या, ते घर नुकतंच रिकामं झालं आहे. 

अफवा पसरवू नका, पोलिसांकडून आवाहन 

बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि भितीचं वातावरण पसरलं. फॉरेन्सिक युनिटचा अहवाल आल्यानंतरच बॉम्ब स्फोट नेमका कशामुळे झाला, हे कळू शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी अफवा पसरवू नये आणि या घटनेचा राज्यातील हिंसाचाराशी संबंध जोडू नये.                             

एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिसांचार                       

मणिपूर 3 मे 2023 पासून जातीय हिंसाचारानं प्रभावित झालं आहे, ज्यामध्ये किमान 221 लोक मारले गेले आहेत आणि 50 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्यात कुकी-जो आणि मेईतेई समुदाय आपसात भांडत आहेत. अलीकडेच सरकारनं मणिपूरबाबत बोलताना संसदेत सांगितलं की, 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 6164 मुले निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत, तर 2638 किशोरवयीन मुली आणि 232 गर्भवती महिला राहत आहेत.          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.