Header Ads

Header ADS

विधानपरिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर विजयी ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार होते रिंगणात

Milind-Narvekar-victory-in-legislative-council-elections-for-11- seats-total-12-candidates-were-in-the-ring


विधानपरिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर विजयी ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार होते रिंगणात

लेवाजगत न्यूज मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आणि सर्वपक्षीयांशी सुमधूर संबंध राखून असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राजकीय चमत्कार करुन दाखवला. मिलिंद नार्वेकर यांना शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या जागेसाठी चुरशीची लढत होणार हे अपेक्षित होते. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता ११ व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मतमोजणी सुरु झाल्यानंतर २७४ मतांची ११ गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली. 






मिलिंद नार्वेकर हे सर्वात पहिले विजयी होतील, असे वाटत होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांची गाडी २० मतांवर जाऊन अडली. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या मतांची गाडी एक-एक करुन पुढे सरकत होती. पहिल्या टप्प्यात त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय मिळवला. भाजपच्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांनीही मोठी आघाडी घेत पहिल्या तासाभरातच विजय मिळवला.


भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडत होती. मात्र, त्यांच्या उमेदवारांना ती मतं मिळाली असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्षांचा पाठिंबा असल्याने तेही सुस्थितीत होते, त्यांचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे १५ आमदार सभागृहात होते. त्यामुळे, जयंत पाटील यांच्याकडे १६ मतं होती. जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी ७ मतांची बेगमी करावी लागणार होती. पण त्यांना ७ मतांची जुळवाजुळव करणे शक्य झालं नसल्याचं दिसून आलं. अजित पवार गटाचे ३९ आमदार सभागृहात आहेत. त्यांना आणखी ७ मते हवी होती. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील ३ मतांच्या भरवशावर त्यांचे गणित अखेर जुळले. तर, उद्धव ठाकरेंकडे १५ आमदार आहेत, त्यांच्या मिलिंद नार्वेकरांना आणखी ८ मते हवी होती. निवडणूक निकालानंतर त्यांना ही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे


विधानपरिषदेच्या ११ विजयी उमेदवारांची यादी


भाजपचे विजयी उमदेवार:-योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत 


शिवसेनेचे विजयी उमेदवार:-भावना गवळी, कृपाल तुमाने


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार:- राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे  


काँग्रेस विजयी उमेदवार:-प्रज्ञा सातव 


शिवसेना ठाकरे गट:-मिलिंद नार्वेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.