Header Ads

Header ADS

फैजपूर शहर 'अ’ दर्जाच्या नगर पालिकेची अवस्था सुविधांबाबत मात्र सध्या ‘ढ’च

Faizpur-City-A-Class-Municipality-Condition-Regarding-Facilities-However-Currently


फैजपूर शहर 'अ’ दर्जाच्या नगर पालिकेची अवस्था सुविधांबाबत मात्र सध्या ‘ढ’च

 फैजपूर - शहरात कोट्यावधी रुपये खर्चुन विविध विकासकामे करण्यात आली आहे. परंतु, शहरातील आसाराम नगर, छत्रपती शिवाजी नगर, मिरची ग्राउंड परिसरा भागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. सर्वत्र चिखल, गटार आणि त्याच्या संयोगातून तयार झालेल्या घसरगुंड्यांवरून दररोज दुचाकीस्वार घसरून पडण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘अ’ दर्जाच्या नगर पालिकेची अवस्था सुविधांबाबत मात्र सध्या ‘ढ’च असल्याचा अनुभव आसाराम नगरासह शहरातील नागरिक पदोपदी घेत आहेत. पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सध्या नागरिकांमध्येमध्ये कमालीची चीड दिसून येत आहे.





शहरातील रस्ते दुरुस्तीवर कोटी रूपये खर्च करुन डांबरीकरण कॉक्रीटकरण करण्यात आले. मात्र, हे काम करीत असताना सबंधीत ठेकेदाराकडून कुठलेच नियोजन केले जात नसल्याने त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. शहरातील आसाराम नगर भागासह शहरातील अनेक भागात खोदकाम केल्यामुळे चांगल्या डांबरी रस्त्यावर मातीच्या थरामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे सर्वत्र घसरगुंड्या झाल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. वाहने चिखलात फसत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तसेच रस्त्यांवरील चिखलामुळे मुलांना शाळेत जाता येत नसून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नागरिकांना चालणेही जीवघेणे होऊन बसले आहे. आसाराम नगरसह शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्याची भीषण परिस्थिती आहे. पावसामुळे या गड्डयांना डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे याकरिता अनेक मौखिक लेखी तक्रारी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्याचीही अशीच भीषण अवस्था झाली असून इतर रहिवाशी वस्तीतील रस्त्यांचीही अशीच गत झाली आहे. तात्पुरती डागडुजी म्हणून खड्ड्यात लाखो रुपयांचा मुरूम टाकून मलमपट्टी केली जाईल. परंतु या मुरूमामुळे स्थिती आणखीन गंभीर होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असताना मात्र, या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.


नगरपालिकेच्या हद्दीत राहत असलो तरी रस्त्यांची अवस्था मात्र, एखाद्या दुर्गम खेड्यासारखी झाली आहे. फैजपूरात काही प्रमाणात रस्त्याची अवस्था बरी असली तरी आसाराम नगरात मात्र कठीण परिस्थिती आहे. शहराचा विस्तार झपट्याने होत असताना नागरिकांकडुन मोठ्या प्रमाणात करपट्टी वसूल केली जात आहे. मात्र सुविधेवर कुठलेच लक्ष दिले जात नसल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. शहरातील रस्ते सध्या अपघाताला आमंत्रण देणारे ठरत असून, पदाधिकारी प्रशासन केवळ टोलवाटोलवी करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने तत्काळ शहरातील रस्त्याची पाहणी करून रस्त्याची व्यवस्था चांगली करावी. अन्यथा रहिवाश्यांना सोबत घेऊन भव्य विराट मोर्चा व आमरण उपोषण करण्यात येईल. अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विनोद कोल्हे (रा. आसाराम नगर) यांनी दिली.

Facebook viral post----?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.