Header Ads

Header ADS

माजी नगरसेविकांचे वायरल चित्रफित प्रकरण; आमदार गीता जैन समर्थकांविरोधात गुन्हा दाखल

 

Ex-corporator's-viral-film-case-lawyer-case-filed-against-Gita-Jain-supporters

माजी नगरसेविकांचे वायरल चित्रफित प्रकरण; आमदार गीता जैन समर्थकांविरोधात गुन्हा दाखल

वृत्तसंस्था भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील भाजपच्या माजी नगरसेविकांच्या वायरल चित्रफिती प्रकरणी आमदार गीता जैन यांच्या समर्थकांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्या राजकीय वाद अधिकच चिघळला आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून मला या प्रकऱणात गोवण्यात येत असल्याचा आरोप आमदार जैन यांनी केला आहे.


भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी १५ आणि १६ जुलै रोजी गोव्यात पक्षाची बैठक आणि सहलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेविकांसह ५८ जण सहभागी झाले होते. गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सर्व जण सहलीसाठी आले होते. हॉटेलात माजी महिला नगसेविका नृत्य करत असतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर वायरल करण्यात आली. ‘आषाढी एकादशीला वारकरीची भक्ती आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांची गोवा वारी’ असा आक्षेपार्ह मजकूर या चित्रफितीमध्ये टाकण्यात आला होता. ही खासगी चित्रफित वायरल करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शुक्रवारी संध्याकाळी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता.  कायदेशीर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी या माजी नगरसेविका आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्यांनी नवघर पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. त्यामुळे पोलिसांनी दिपक ठाकूर आणि सोनू यादव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (२) ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी या प्रकरणाचा तपास करत आहेत.




गुन्हा दाखल करण्यासाठी जातीचा आधार

माजी नगरसेविका रुपाली शिंदे-मोदी (५०) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी अनुसूचित जातीची (एससी) असल्याने हेतुपुरस्सर माझी बदनामी करण्यासाठी ही चित्रफित विविध समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी जातीचा आधार घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.


दबावापोटी गुन्हा दाखल- आमदार गीता जैन

याप्रकरणी आमदार गीता जैन यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्या आक्रमक झाल्या आहेत. शनिवारी जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ला बोल केला. माझ्या समर्थकांवर गुन्हे दाखल करून या चित्रफित प्रकरणात मुद्दाम मला खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रफितीमध्ये आक्षेपार्ह काहीच नव्हते. उलट ज्या व्यक्तीने चित्रफित काढून आमच्या कार्यकर्त्यांकडे पाठवली त्याला आरोपी करणे गरजेचे होते. मात्र काही महिलांनी पोलिसांवर दबाव टाकून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप जैन यांनी केला. या चित्रफितीमुळे मेहता आणि जैन यांच्या राजकीय वाद वाढला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.