Header Ads

Header ADS

वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

In Warangaon-a minor-dispute-a-youth-murder-two-injured


वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच आहे. सोमवारी जळगावात खून झाल्याची घटना ताजी असतानांच मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मराठे पान मंदिर भागात खून झाला आहे. दोन गटात दुचाकी लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका गटाने चॉपरने प्राणघातक हल्ला केला. यात एका तरुणाचा खून झाला असून दोन जण जबर जखमी झाले आहेत. या घटनेचा वरणगाव पोलीस तपास करीत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकरी फरार झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती सपोनि भरत चौधरी यांनी पत्रकारांना दिली आहे.

सय्यद आरिफ सय्यद समद अली (वय २८, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, पत्नी यांच्यासह राहतो. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात त्याने त्याची दुचाकी लावली होती.

    त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली. यामधूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने तरुणावर चॉपरने तिघांवर प्राणघातक हल्ला केला.

  यात सय्यद आरिफ याच्या छातीत चॉपर घुसल्याने तो खाली कोसळला. तर आकिब अली कमर अली (वय २२) याच्या गळ्यावर, उजव्या हातावर व मुश्ताक अली सय्यद (वय ५०, दोन्ही रा. वरणगाव) यांच्या डोक्यावर वार झाले आहेत. दोघेही जबर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तिघांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सय्यद आरिफ याला मयत घोषित करण्यात आले. तर आकिब व मुश्ताक अलीयांच्यावर उपचार सुरु आहेत. मयत आरिफ याचा मृतदेह  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

      घटनेची वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच असून सोमवारी जळगाव शहरातदेखील कामगाराचा खून झाला होता. आता वरणगावात खून झाल्याने जळगाव पुन्हा चर्चेत आले आहेत. वरणगाव शहरात तणाव पूर्ण शांतता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.