श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी कुऱ्हा-काकोड्याच्या श्रीरामाचा असाही संकल्प
श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी कुऱ्हा-काकोड्याच्या श्रीरामाचा असाही संकल्प
प्रतिनिधी मुक्ताईनगर -एकाद्या व्यक्तीवर असलेल्या निष्ठा, प्रेमापोटी निष्ठावानांकडून अनेकदा वेगवेगळे संकल्प, उपक्रम राबविले जातात. लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे युवकाने श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी ४ जूनपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची रावेर मतदार संघात एकच चर्चा सध्या सुरु आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या विजयासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे या युवकाने हा संकल्प केला आहे. श्रीराम पाटील निवडून येतील तोपर्यंत म्हणजे ४ जूनपर्यंत पायात चप्पल घालणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या विजयासाठी आपल्या कुऱ्हा काकोडा गावासह मुक्ताईनगर मतदार संघात श्रीराम इंगळे हे प्रचार करत असून श्रीराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. आज श्रीराम इंगळे यांनी उमेदवार श्रीराम पाटील यांची घोडसगाव येथे भेट घेतली व त्यांना विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला. श्रीराम इंगळे हे सध्या भर उन्हाळ्यातही अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता प्रचार करीत आहेत. त्यांचा हा संकल्प श्रीराम पाटील यांच्यावर असलेली निष्ठा व प्रेम दर्शवते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत