फैजपूर येथे दिव्यांगाच्या हस्ते निष्कलंक व्हिजन सेंटरचे उद्धाटन सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांचा पुढाकार
फैजपूर येथे दिव्यांगाच्या हस्ते निष्कलंक व्हिजन सेंटरचे उद्धाटन सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांचा पुढाकार
फैजपूर लेवाजगत प्रतिनिधी- मनुष्यजन्म हा असंख्य योनीतील पुण्याईव संचिताचे फळ असून या मानवी जीवनाचे सार्थक मानवसेवा, रुग्णसेवा, समाजसेवा, गोसेवा, धर्मसेवा व प्रभूसेवेच्या माध्यमातून केल्याने जीवनात खऱ्या अर्थाने ब्रम्हानंद प्राप्ती होत असते. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट सदैव 'परोपकाराय पुण्याय' याच उद्देशाने कार्यरत असून मोहनराव नारायणा नेत्रालय, नांदुरा यांच्या सोबतीने ' निष्कलंक व्हिजन सेंटर' फैजपूरवासियांसाठीच नव्हे तर पंचक्रोशीतील दृष्टीदोष असणाऱ्या असंख्य रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या अल्पदरातील डोळे तपासणी व ऑपरेशनची सुविधा असणाऱ्या सेंटरचा जनतेने अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन प पू महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व मोहनराव नारायणा नेत्रालय, नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने निष्कलंक व्हीजन सेंटर, फैजपूर येथील उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी बोदवड येथील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले दिव्यांग बांधव श्री सुनील वाघ, डॉ. फनेंद्र उरीमी अध्यक्ष श्री तिरुपती बालाजी संस्थान मोहनराव नारायण नेत्रालय व डेंटल नांदुरा, सौ. राधिका उरीमी,
श्री नारायणा उरीमी सचिव श्री तिरुपती बालाजी संस्थान, डॉ. विजय पाटील व्यवस्थापक मोहनराव नारायणा नेत्रालय व डेंटल नांदुरा, डॉ. क्रांती कटटूरवार सीनियर आय सर्जन मोहनराव नारायण नेत्रालय नांदुरा, श्री शामकांत काळवीट सेवानिवृत्त मुख्याध्यापक नांदुरा, श्री पांडुरंग दगडू सराफ माजी नगराध्यक्ष, श्री नंदू महाजन तांदलवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान श्रीमती रक्षाताई खडसे यांनीही या सेंटरला भेट दिली.
प्रास्ताविक श्री श्यामकांत काळवीट सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा सेवाव्रती प्रमुख यांनी केले. त्यात मोहनराव नारायणा नेत्रालयाचा प्रवास, सोयी-सुविधा व उपचार पद्धती यावर सविस्तर विवेचन केले. सन २०१७ मध्ये स्थापन झालेल्या मोहनराव नारायणा नेत्रालयाची ख्याती विदर्भातील सर्वात मोठे नेत्रालय म्हणून झाली असून आज मितीस दोन लाख लोकांपेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतले आहेत. तर तीस हजार रुग्णांना यशस्वी शस्त्रक्रिया करून दृष्टी प्रदान करण्यात नेत्रालयाला यश आले आहे. याप्रसंगी डॉ. विजय पाटील व्यवस्थापक मोहनराव नारायणा नेत्रालय व डेंटल नांदुरा यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी सेंटर फैजपूर येथे सुरू करण्याची प्रेरणा महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरी जी महाराज असल्याचे सांगत मोहनराव नारायणा नेत्रालयाची ही दहावी शाखा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत असून याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन केले. तथा श्री फनेंद्र उरीमी यांनी स्वर्गीय मोहनराव यांचा कांदा व्यापारी, संस्थापक अध्यक्ष येथ पासून भारतातील सर्वात मोठ्या बजरंगमूर्तीचे निर्माते व रुग्णसेवेतून समाजसेवेला वाहून घेतलेले एक सेवाव्रती व्यक्तिमत्व यांचा यथोचित परिचय करून दिला. यावेळी ज्यांनी उदार भावनेने निष्कलंक व्हिजन सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिली ते कै. हिरामणशेठ विठू भिरूड यांचे सुपुत्र रोहिदास भिरूड व मिलिंद भिरूड परिवार यांचा सन्मान करण्यात आला. तथा या कार्यासाठी समर्पित व्यक्तिमत्व श्री उमेश पाटील व त्यांचा परिवार यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी समाजामध्ये दिव्यांग बंधूंकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा व त्यांना योग्य ती मदत, मार्गदर्शन व्हावे यासाठी दिव्यांग सेनेचे अध्यक्ष नितीन महाजन, महिला संघटक सौ. सुषमा महाजन, सल्लागार राहुल कोल्हे, तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, उपाध्यक्ष ललित वाघुळदे, तालुका सचिव चेतन तळेले, रवींद्र कोळी, नाना मोची, अंकुर भारंबे, विनोद बिऱ्हाडे, कृणाल वाघूळदे या दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना प पू महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी मोहनराव नारायणा नेत्रालयाच्या सर्व टीमचे अभिनंदन करीत फैजपूर व पंचक्रोशीतील रुग्णांना फैजपूर परिसरात सेवा देत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या रुग्णांची सेवा होणार असून ही अत्यंत समाधानाची बाब आहे. माझे गुरु जगन्नाथ महाराज यांना नक्कीच आज आनंद होत असेल असे त्यांनी सांगून परिसरातील नागरिकांनी याचा मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले. निष्कलंक व्हिजन सेंटरचे उद्घाटक श्री सुनील वाघ बोदवड या दिव्यांग असलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आत्मकथनातून शरीरातील प्रत्येक अवयवाची काळजी घ्यावी. त्यातल्या त्यात डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी. ज्ञानेंद्रिय व पंचंद्रिये असतानाचे जीवन व दिव्यांग म्हणून जगावे लागणारे जीवन यात खूप फरक असून भगवंताने दिलेले सक्षम व सुदृढ शरीर निरोगी आरोग्यदायी ठेवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. सेंटरची पहिली रुग्ण सेवाव्रती गं. भा. शारदाताई महाजन ह्या होत्या. ते बऱ्याच काळापासून निष्कलंक धाम वढोदा येथे निष्ठेने सेवा देत असून त्यांच्या ऑपरेशनचा खर्च पांडुरंग दगडू सराफ हे उचलणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व मोहनराव नारायणा नेत्रालयाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी फैजपूर येथील डॉक्टर्स, पत्रकार, मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत