भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकासह कर्मचार्यावर हल्ला
भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकासह कर्मचार्यावर हल्ला
लेवाजगत न्युज भुसावळ:- भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर मंगळवारी दुपारी मद्रास बेकरी या स्टॉलच्या शुभारंभात विक्रेते आपसात भिडल्यानंतर नियंत्रणासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. के. मीना व त्यांचे सहकारी महेंद्र कुशवाह यांच्यावरच विक्रेत्यांनी हल्ला चढवल्याची संतापजनक घटना मंगळवारी दुपारी 12.20 ते 1 दरम्यान घडली. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात 14 विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून काहींची धरपकड सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे स्थानकावर जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षा बलाच्या निरीक्षकांवरील हल्ल्याने खळबळ
रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म पाचवर मंगळवारी दुपारी 12.20 वाजता मद्रास बेकरी या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले. यावेळी प्लॅटफार्म सहावरील एम.आर. इंटरप्रायजेसचे वेंडर व बाहेरील मोठ्या प्रमाणावर लोक प्लॅटफार्म क्रमांक पाचवर जमल्यानंतर त्यांच्यात वादावादी सुरू झाली. याबाबतची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळताच आरपीएफ निरीक्षक आर. के. मीना, कर्मचारी महेंद्र कुशवाह यांच्यासह कर्मचारी दाखल झाल्यानंतर ते जमावाला वादापासून परावृत्त करीत असताना संशयीतांनी निरीक्षक मीना यांच्यावर हल्ला चढवला तसेच युनिफार्मचे बटन तोडले तसेच कर्मचारी महेंद्र कुशवाह यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. कुशवाह यांच्या कपाळाला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. भुसावळातील आरपीएफ निरीक्षक व कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती कळताच तत्काळ लोहमार्ग पोलीस, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पघडन हे त्यांच्या सहकाऱ्यांसह रेल्वे स्थानकावर दाखल झाले व त्यांनी शांतता प्रस्थापीत केली.
14 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
आरपीएफ निरीक्षक आर. के. मीना यांच्या फिर्यादीवरून संशयीत अफसर रफीक मेमन, रीयाज अब्दुल मोहम्मद अब्दुल रेहमान, शेख कलीमोद्दीन शेख अलीमोद्दीन, शेख नदीम नथू बागवान व मद्रास बेकरीचे सय्यद हमीद सय्यद कासीम, रईस सरदार बागवान, सय्यद कासीफ सय्यद हमीद, शेख इरफान शेख चांद, सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमीद, वसीम खान बिस्मिल्ला खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ रेल्वे स्थानकावरील विक्रेत्यांची दादागिरी पाहता लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आरपीएफ आयुक्तांनी रेल्वे स्थानकाला भेट देत परीस्थितीचा आढावा घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत