वडगाव नगरपरिषद इमारत आणि शिवराज्य भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
वडगाव नगरपरिषद इमारत आणि शिवराज्य भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
लेवाजगत न्युज कोल्हापूर : वडगाव नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून शिवराज्य भवन बांधकामासाठी दीड कोटींचा निधी दिला आहे. या वास्तूंसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून तो निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय वास्तूमधून सर्वसामान्यांच्या कामांना न्याय देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
वडगाव नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे तसेच शिवराज्य भवनच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. वडगाव सराफ व्यापारी नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना सुवर्णमुद्रा वाटप देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैयशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजुबाबा आवळे, आमदार डॉ. विनय कोरे,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी देण्याबरोबरच पेठवडगाव रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावला जाईल. वडगावनगरीचा विकास आराखडा नगरपालिकेने केला असून तो हद्दवाढ झाल्यानंतर पुर्नस्थापित करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून, कोणावरही अन्याय होणार नाही असा करण्यात येईल, तोपर्यंत या विकास आराखड्याला स्थगिती देवू असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला. यामुळे राज्यातील ४ कोटी लोकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये एस.टीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिली. लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना पुर्वी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत दिला जात होती. यामध्ये बदल करुन ही मदत दुप्पट केली आहे. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टर केली आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासन देत आहे. शेतकऱ्यांना केंद्र शासन ६ हजार रुपये देते त्याबरोबर आता राज्य शासनही ६ हजार रुपये देत आहे. त्यामुळे वर्षाला १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत.एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येतो. प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले, मंदिरे यांच्या जतनासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही पेठवडगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती देवून यानगरीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध कामांची मागणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत