विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगलेला 'त्वरण २०२४' महोत्सव थाटामाटात पार नरसी मुंजी मॅनेजमेंट स्टडीजकडून 'त्वरण २०२४'चे आयोजन
विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगलेला 'त्वरण २०२४' महोत्सव थाटामाटात पार
नरसी मुंजी मॅनेजमेंट स्टडीजकडून 'त्वरण २०२४'चे आयोजन
उरण (सुनिल ठाकूर ):नवी मुंबई येथील नरसी मुंजी मॅनेजमेंट स्टडीज या प्रसिद्ध संस्थेच्यावतीने 'त्वरण २०२४' या तीन दिवसांच्या आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव ७ ते ९ मार्चदरम्यान महाविद्यालयातील संकुलातच पार पडला. या महोत्सवात तब्बल तीन हजाराहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. मुंबईतील नामांकीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच कॉर्पोरेट व्यवसायातील तज्ञांनी त्वरण महोत्सवात हजेरी लावली. चित्रपट अभिनेते करण कांचन, यशराज आणि पार्थ श्रीवास्तव या प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती महोत्सवाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
यंदा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीने महोत्सवाची संकल्पना थोडी आगळीवेगळी ठरवली. 'अस्त्रियाचे अग्निपंख-फिनिक्स पक्षाची भरारी' या संकल्पनेवर आधारित यंदाच्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजित केले गेले.
महोत्सवात नृत्य, संगीत, नाटक, पाककला, वित्त, क्रीडा, रोबोट युद्ध आदी अनेक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीने सगळ्या कार्यक्रमांचे नियोजन व्यवस्थित पार पाडले. महोत्सवातील विविध कार्यक्रमात स्पर्धकांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.
'नरसी मुंजी मॅनेजमेंट स्टडीज' या प्रसिद्ध संस्थेचे संचालक डॉ. सुभाषिश भट्टाचार्य म्हणाले, "त्वरण २०२४ हा महोत्सव शिक्षण, प्रेरणादायी खेळ यांच्यासह नटलेला सांस्कृतिक महोत्सव आहे. समाजात सर्वांनी एकत्र समूहात राहावे, या उद्देशाखातर 'त्वरण २०२४' महोत्सवाचे आयोजन केले गेले. वेगवेगळ्या क्षेत्रातून येणारे स्पर्धक एकत्र येत वेगळाच कलाविष्कार घडवतील हा आमचा महोत्सव आयोजित करण्यामागील मुख्य हेतू होता." ते पुढे म्हणाले की, " त्वरण २०२४ ची संकल्पनाही प्रेरणादायी सकारात्मक दृष्टिकोन देणारी आहे. आगामी भविष्यकाळ हा सुखाचा आणि समृद्धीचा असावा यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन समविचारसरणींचा पुरस्कार केला पाहिजे. राखेतून उंच भरारी घेणारा आशेचा किरण नेहमीच प्रज्वलित ठेवा. "
हाच मुद्दा सांस्कृतिक समितीच्या प्रमुख डॉ. रुचिरा वर्मा यांनी मांडला. महाविद्यालयीन महोत्सव हा कॉलेज जीवनातील अविभाज्य भाग असतो. महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल सद्भावना निर्माण होते, त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. शैक्षणिक आयुष्यात दररोजच्या अभ्यासासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणेही गरजेचे असते. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांचा ताण तणाव दूर होतो, मन प्रफुल्लित होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. महोत्सवात विद्यार्थ्यांची प्रत्येक कार्यक्रमात सकारात्मक ऊर्जा दिसून आली. केवळ विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणे या विचारांवर महोत्सव टिकून राहिला नाही. याउलट या महोत्सवामुळे महाविद्यालयातील कॅम्पस संस्कृती सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण बनली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत