गुजरातचा ६३ धावांनी पराभव करत चेन्नई गुणतक्त्यामध्ये अव्वल स्थानावर
गुजरातचा ६३ धावांनी पराभव करत चेन्नई गुणतक्त्यामध्ये अव्वल स्थानावर
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ६३ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ६ गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४३ धावा करता आल्या. या विजयासह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
६३ धावांनी झालेला पराभव हा गुजरातचा आयपीएलमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी १० महिन्यांपूर्वी वानखेडेवर मुंबई इंडियन्सकडून २७ धावांनी पराभव झाला होता. चेन्नईने मुंबईचा विक्रम मोडला आहे. सीएसकेचा पुढील सामना ३१ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा पुढील सामना ३१ मार्च रोजी अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी ३२ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. यामध्ये रचिनचे योगदान २० चेंडूत ४६ धावांचे होते. यादरम्यान रचिनने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट २३० होता. अजिंक्य रहाणे पुन्हा फ्लॉप झाला, पण त्याने कर्णधार ऋतुराजसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. रहाणे १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला.
ऋतुराजचे कर्णधार म्हणून पहिले अर्धशतक हुकले. तो ३६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर शिवम दुबेने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर धुमाकूळ घातला. तो येताच आर साई किशोरच्या चेंडूवर षटकार ठोकला. शिवमने अवघ्या २२ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. मात्र, अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. दुबेने २३ चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली.
दुबेने चौथ्या विकेटसाठी डॅरिल मिशेलसोबत ५७ धावांची भागीदारी केली. दुबे बाद झाल्यानंतर यूपीचा समीर रिझवी फलंदाजीला आला आणि त्यानेही छोटी पण उपयुक्त खेळी खेळली. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर रिझवीने जगातील सर्वोत्कृष्ट टी-२० फिरकी गोलंदाज रशीदला षटकार ठोकला. यानंतर त्याच षटकात आणखी एक षटकार लागला. तो सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने १४ धावा करून बाद झाला. २० चेंडूत २४ धावा केल्यानंतर मिचेल नाबाद राहिला. त्याचवेळी तीन चेंडूत सात धावा करून जडेजा धावबाद झाला. गुजरातकडून राशिदने दोन बळी घेतले. तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
२०७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल (८) आणि वृद्धिमान साहा (२१) यांना तंबूमध्ये पाठवून दीपक चहरने गुजरातला दोन मोठे धक्के दिले. यातून संघाला सावरता आले नाही कारण धोनीने विकेटच्या मागे घेतलेल्या शानदार झेलने विजय शंकरला तंबूमध्ये पाठवले. त्याला १२ धावा करता आल्या. यानंतर रहाणेने डेव्हिड मिलरचा (२१) शानदार झेल घेतला.
अजमतुल्ला उमरझाई ११ धावा, राहुल तेवतिया ६ धावा आणि रशीद खान एक धावा करून बाद झाले. उमेश यादव ११ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला आणि स्पेन्सर जॉन्सन पाच धावा करून नाबाद राहिला. दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर डॅरिल मिशेल आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
शिवम दुबेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. बुधवारी हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. कोणता संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय नोंदवतो हे बघणं नक्कीच औत्सुक्याचे असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत