थोर नाटककार विनायक पाटील स्मृतीदिनी सिनेनाट्य, साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि प्राणीमित्र पुरस्काराने सन्मानित
थोर नाटककार विनायक पाटील स्मृतीदिनी सिनेनाट्य, साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि प्राणीमित्र पुरस्काराने सन्मानित
लेवाजगत न्यूज मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजमनावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटविणार्या आठ मान्यवरांचा थोर नाटककार विनायक पाटील यांच्या २९ व्या स्मृतीप्रीत्यर्थ दादरच्या काशिनाथ धुरू सभागृहात सन्मान करण्यात आला.
सदर भ्रातृभावी सन्मान सोहळा दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट, विनायक पाटील स्मृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. जवळपास तीन-साडेतीन तास रंगलेल्या ह्या सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश हांडे उपस्थित होते.
सिनेलेखक, पटकथाकार, दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले किशोर बेळेकर यांनी आजचे आघाडीचे संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेला "गांधी टॉल्क" 'हा मराठी मूकपट तयार केला आहे. त्याच्या अनुभवाचे केलेले कथन रंजक ठरेल, तर नाट्य रंगकर्मी मोहन साटम यांनी अनेक नाटकांत दिग्दर्शक, अभिनेता म्हणून लिलया पेलताना "आयच्यान खरा सांगान "ही पहिली मालवणी कादंबरी लिहिली. अभिनेत्री विशाखा कशाळकर यांनी सांगितले, वयाच्या दहाव्या वर्षी बालनाट्यातून आपण अभिनयाला आरंभ केला. विशाखा कशाळकर प्रतिष्ठानची स्थापना करून एकांकिका लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. अभिनेता अनिल गवस यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये अभिनय करून आपली खास ओळख निर्माण केली. वसंत सकपाळ यानी वयाची ७१ वर्षे लोकनाट्यात विनोदी भूमिका साकारून आपले संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वेचले. काशिनाथ माटल यांच्या कथालेखनाचा अवाका मोठा असून, त्यांनी अलिकडेच लिहिलेल्या "खेळ मांडियेला नवा" या कथा संग्रहाला राज्यस्तरीय तीन पुरस्कार मिळाले आहेत. लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर संपूर्ण "सावट" कथासंग्रह लिहिला. हीच जिद्द त्यांना चित्रपट लेखनाकडे घेऊन गेली आहे, असे त्यांनी सांगितले.
नृत्य दिग्दर्शिका सुमित्रा राजगुरू यांनी नृत्यकलेत शून्यातून विश्व निर्माण केले, असे सांगितले. पाणवठा फाऊंडेशनचे गणराज जैन हे महाड-पोलादपूर परिसरात अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम चालवीत आहेत. त्यांची ही माहिती खचाखच भरलेल्या सभागृहाला थक्क करून गेली. एकदा तर कोब्राच्या दंशाने त्यांना 'आयसीयू' मध्ये दाखल करावे लागले आहे. या कामात त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना जैन यांची साथ लाभली आहे, हेही जैन यांनी आवर्जून सांगितले. त्यांना मदत करणार्या कु. महाश्वेता पांचाळ यांचीही ओळख करून दिली.
संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी नारायण जाधव यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले की, नाटकार विनायक पाटील हे केवळ नाटककार नव्हते, तर माणूसपण जोपासणारे कर्मयोगी होते. प्रमुख पाहुणे सुरेश हांडे यांनी सांगितले, नारायण जाधव यांनी पुरस्कारासाठी जणू हिरे-मोत्याच्या खाणीतूनच मान्यवरांची निवड केली, त्यामुळेच हा कार्यक्रम रसिकांची चांगलीच दाद घेऊन गेला आहे. शाहीर मधू खामकर आणि संगीतकार मनोहर गोलांबरे यांनी अन्य शाहीर दत्ता ठुले, सुखदेव कांबळे, निलेश जाधव यांच्या मदतीने शाहिरी कार्यक्रम सादर केल्याने कार्यक्रमाची रंजकता उत्तरोत्तर वाढत गेली. याप्रसंगी रविंद्र प्रभु, अशोक पाटील, सुबल सरकार, शशिकला निर्गुण, अनंत घोगळे या नावाने पुरस्कार देऊन त्यांचे स्मरण करण्यात आले. आभारप्रदर्शन दादर सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रम समितीच्या कार्यवाह सुमेधा डोंगरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत