इन्स्टाग्रामवर मित्राला नेपाळ येथून भेटण्यासाठीआलेल्या अल्पवयीन मुलिस मुंब्रा येथे मित्रानेकेला लैंगिक अत्याचार
इन्स्टाग्रामवर मित्राला नेपाळ येथून भेटण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलिस मुंब्रा येथे मित्रानेकेला लैंगिक अत्याचार
वृत्तसंस्था मुंबई-इन्स्टाग्रामवर ओळख झाली. चॅटिंग सुरू झालं. त्यातून प्रेम झालं. एकमेकांचे नंबर घेतले, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि नंतर प्रियकराला भेटण्यासाठी १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी थेट नेपाळची सीमा ओलांडून मुंबईत आली. आभासी जगातला मित्र आपला प्रियकर होईल, अशी स्वप्न घेऊन आलेल्या या अल्पवयीन मुलीला मात्र एका वेगळ्याच संकटाला तोंड द्यावं लागलं. ज्या प्रियकराने भेटण्यासाठी नेपाळहून बोलावलं होतं, त्याला फक्त तिचे शरीर भोगायचं होतं, हे त्या अल्पवयीन मुलीला माहीत नव्हतं. प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्यानंतर सदर मुलीला वाऱ्यावर सोडून दिलं. ही धक्कादायक घटना घडली आहे मुंब्रा येथे. अत्याचाराच्या धक्यातच मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना मुंबईकर प्रवाशांमुळे सदर घटना उजेडात आली.
झालं असं की, मध्य रेल्वेच्या दादर लोकलमध्ये एक मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसलेली सहप्रवाशांना आढळून आली. सहप्रवाशांनी मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करून तिला दादर स्थानकाच्या पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यावर घडलेला प्रसंग कळला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. टाइम्स ऑफ इंडियाने सदर वृत्त दिले आहे.
प्रकरण काय आहे?
पीडित मुलगी आणि आरोपीची महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपीचे वय २२ वर्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलायला सुरुवात केली. दोघांचे संभाषण जसे पुढे गेले, तसे आरोपीने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. यासाठी तिने मुंबईत यावे, अशी अटही त्याने ठेवली. तसेच ती मुंबईला आली नाही, तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकीही आरोपीने दिली. आरोपीच्या शब्दांवर विश्वास ठेवून अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना न सांगता नेपाळहून मुंबईला प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी पीडित मुलीने बसने गोरखपूरपर्यंतचा प्रवास केला. त्यानंतर तिथून ट्रेनमध्ये बसून मुंबईला आली. १९ मार्च रोजी सकाळी ती कल्याण स्थानकात पोहोचली, तेव्हा आरोपी तिची वाट पाहत होता. तिथून ते मुंब्र्यात गेले. आरोपीने तिथे एक खोली भाड्याने घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच खोलीत आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याच दिवशी पीडितेला दिवा स्थानकावर सोडून आरोपी पळून गेला.
दिवा स्थानकावरून पीडितेने दादरला जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि तिची अवस्था पाहून सहप्रवाशांनी तिची विचारपूस केली. दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आमच्याकडे मुलीला आणल्यानंतर आम्ही तात्काळ तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने पीडित मुलीकडून तिचा फोन काढून घेतला होता. मात्र पीडितेला त्याचा मोबाईल नंबर पाठ होता. त्यावरून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७६ नुसार बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडाळा येथे राहणारा आहे. पीडितेच्या मोबाइलमधून त्याने दोघांचे संभाषण, इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हे प्रकरण आता मुंब्रा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत