Header Ads

Header ADS

यशस्वीने भारताला तारले, गिल आणि अय्यर अपयशी, अश्विनकडून आशा

Yashasvi-saves-India,- Gill-and-Iyer-failure-hope-from-Ashwin


यशस्वीने भारताला तारले, गिल आणि अय्यर अपयशी, अश्विनकडून आशा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस.  राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून ३३६ धावा केल्या. पहिल्या दिवशी एकूण ९३ षटके खेळली गेली. आजचा दिवस यशस्वी जैस्वालचा होता. आता यशस्वीसोबत रविचंद्रन अश्विनही खेळपट्टीवर असून दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आपली धावसंख्या ५०० धावांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करेल. यशस्वी एका टोकाला उभा आहे, पण दुसऱ्या टोकाला अश्विनला साथ द्यावी लागेल.

   या सामन्यात यशस्वी जैस्वालने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली.  २५७ चेंडूत नाबाद १७९ धावा केल्या आहे. आतापर्यंत त्याने १७ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. त्याचवेळी अश्विनने १० चेंडूत पाच धावा केल्यानंतर नाबाद आहे. या डावात यशस्वीशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. गिलने ३४ धावा केल्या. पहिला सामना खेळत असलेल्या रजत पाटीदारीने ३२ धावा केल्या.

   भारतीय कर्णधार रोहित शर्मा १४ आणि श्रेयस अय्यर २७ धावा करून बाद झाले. अक्षर पटेलनेही २७ धावा केल्या. श्रीकर भरत दिवसअखेर १७ धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमदने प्रत्येकी दोन बळी घेतले. टॉम हार्टले आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. १४ षटके टाकूनही जो रूटला एकही विकेट मिळाली नाही.

    भारत आणि परदेशात कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी हा भारतातील २३ वर्षांखालील केवळ चौथा फलंदाज आहे. यशस्वीने वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटीत १७१ धावांची शानदार खेळी केली होती. आता त्याने भारतात शानदार शतक झळकावले आहे. यशस्वीच्या आधी रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे हे चार खेळाडू मुंबईच्या रणजी संघाचा भाग आहेत.

    यशस्वीने सामन्याच्या पहिल्या दिवशी १७९ धावा केल्या आणि कोणत्याही कसोटीत पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या क्लबमध्ये सामील झाला. या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे. वीरेंद्र सेहवाग २२८ धावांसह अव्वल स्थानावर आहे.  तसेच तो १९५ आणि १८० धावांसह दुसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.  वसीम जाफर १९२ धावांसह तिसऱ्या तर शिखर धवन १९० धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

    इंग्लंडविरुद्ध एका दिवसात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.  करुण नायर २३२ धावांसह पहिल्या तर सुनील गावस्कर १७९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

    रजत पाटीदारनेही भारतासाठी पहिला सामना खेळला. १९८० नंतर वयाच्या ३० पेक्षा जास्त वयात भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा तो दुसरा सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज आहे. सूर्यकुमार यादव या बाबतीत आघाडीवर आहे. रजतने वयाच्या ३० वर्षे  आणि २४६ व्या दिवशी पहिली कसोटी खेळला. त्याचवेळी, सूर्यकुमारने वयाच्या ३२ वर्षे आणि १४८ व्या दिवशी नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

    जेम्स अँडरसनने वयाच्या ४१ व्या वर्षी हा सामना खेळला आणि भारतात कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात वयोवृद्ध खेळाडूंच्या यादीत सामील झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.