Header Ads

Header ADS

पुण्यात शिवगर्जना महानाट्याला दुसऱ्या दिवशीही शिवप्रेमींची अलोट गर्दी


पुण्यात शिवगर्जना महानाट्याला दुसऱ्या दिवशीही शिवप्रेमींची अलोट गर्दी


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग भव्य मंचावर सादर


लेवाजगत न्युज पुणे :- हर हर महादेव, जय जय जय जय जय भवानी जय जय जय जय जय शिवाजी, आम्ही शिवबाची चाकरं.., एक मुजरा भगव्या झेंड्याला एक मुजरा जरी पटक्याला…, युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला या आणि अशा विविध ऐतिहासिक घोषणा, गाणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून शिवप्रेमींनी 'शिवगर्जना' या  महानाट्याचा आनंदानुभव घेतला.


 राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशीही महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी महानाट्याचा अखेरचा प्रयोग सादर होणार आहे.


भव्य मंचावर शिवप्रेमींनी अनुभवला शिवकालीन इतिहास


देखण्या आणि भव्य मंचावर  शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. वेरुळ, विजयनगर साम्राज्यांवर परकीयांचे आक्रमण, बाल शिवाजींचा जन्म, पन्हाळा किल्ला वेढा, आग्र्याच्या दरबारातील प्रसंग, कोंढाणा किल्ला झुंज, स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती, राज्याभिषेक यासह स्वराज्य निर्मितीच्या विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसरात जणू साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ अवतरला होता.  जय भवानी... जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला. 


यावेळी आमदार सुनील टिंगरे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


'शिवगर्जना' महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.