Header Ads

Header ADS

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा दस्तऐवज : एक बृहदप्रकल्प संदीप भानुदास तापकीर(इतिहास अभ्यासक व लेखक)

 

Documenting-Forts-in-Maharashtra-A-Major-Project-Sandeep-Bhanudas-Taapkir-History-Scholar-and-Writer


महाराष्ट्रातील किल्ल्यांचा दस्तऐवज : एक बृहदप्रकल्प

संदीप भानुदास तापकीर(इतिहास अभ्यासक व लेखक)


डॉ. नि. रा. पाटील हे गॅझेटियर विभागात कार्यरत असताना जिल्हा व राज्य गॅझेटियर ग्रंथाचे संकलन व सर्वेक्षणाचे काम त्यांच्याकडे आले. ही गोष्ट आहे १९७५-७६मधील. तेव्हापासून त्यांना नोकरीमुळे छोट्या-मोठ्या किल्ल्यांवर जावे लागले. परिणामी, त्यांनी किल्ल्यांचा अभ्यास केला. काही अपरिहार्य कारणांमुळे सरकारचा तो ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही; मात्र विभागप्रमुख डॉ. बी. जी. कुंटे व डॉ. के. के. चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना किल्ल्यांची गोडी लागली. त्यांनी अभ्यासलेले किल्ले स्वतंत्रपणे खंडरूपात प्रकाशित करायचे ठरविले. खरं तर दहा-पंधरा वर्षांपूर्वीच ही मालिका प्रकाशित होणार होती. तेव्हा त्यातला एक खंड प्रकाशितदेखील झाला होता. आता तेव्हा काही कारणांमुळे प्रकाशित न झालेला हा प्रकल्प सायन पब्लिकेशन्स प्रा. लि.द्वारा पाच खंडांमध्ये प्रकाशित झाला आहे. त्याचे जोरदार स्वागतही झाले आहे. हे एका टीमने करायचे काम एकट्या डॉ. नि. रा. पाटील यांनी केले आहे. हीच मुळात अत्यंत अफाट गोष्ट आहे. यासाठी ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. महाराष्ट्रात अनेकांनी एकत्रितपणे करण्याचे प्रकल्प एका व्यक्तीने पूर्ण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता या पंक्तीत डॉ. नि. रा. पाटील हेदेखील त्यांच्या कर्तृत्वाने सन्मानपूर्वक समाविष्ट झाले आहेत. या खंडांमधून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या किल्ल्यांचा आढावा घेतला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, किल्ल्याची केवळ तटबंदी, बुरूज व इमारती यांचेच त्यांनी वर्णन करण्यात समाधान मानलेले नाही; तर त्या किल्ल्यात घडलेल्या घडामोडी, तह, शिलालेख, तेथील राजकीय जीवन, साहित्यनिर्मिती, सांस्कृतिक व आर्थिक स्थित्यंतरे, जलसाठा, विविध इमारती, कोठारे, प्रवेशद्वारे, माची, बालेकिल्ला, मंदिरे इत्यादी गोष्टींची माहिती दिल्यामुळे हे खंड वाचनीय तर झालेच आहेत; पण त्यांना संदर्भ ग्रंथाचे मूल्यदेखील प्राप्त झाले आहे. त्यांनी दुर्गांचा इतिहास लिहिताना तो थेट भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत घेतला आहे. किल्ल्यांचे नकाशे, जिल्हावार मांडणी ही या ग्रंथाची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातील अभ्यासकांना त्यांच्या सोयीनुसार ते ते किल्ले नियोजन करून पाहता येतील.

महाराष्ट्र आणि किल्ले यांचे अतूट नाते आहे. संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या आधारे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हा पूर्वेतिहास आपल्याला सुपरिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीमध्ये दुर्गनीतीला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी काही मोजके किल्ले जसे नव्याने बांधले, तसेच अनेक किल्ल्यांची पुनर्बांधणी केली. आजही हजारो दुर्गप्रेमी अत्यंत भक्तीभावाने गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग, वनदुर्ग यांच्यावर जात असतात. महाराष्ट्रातील दुर्गांचा हा गौरवशाली इतिहास डॉ. नि. रा. पाटील यांनी बृहदप्रकल्पाद्वारे आपल्यासमोर ठेवला आहे. या ग्रंथांमुळे पर्यटकांना व  अभ्यासकांनादेखील मोलाची माहिती तर मिळणारच आहे; परंतु त्याचबरोबर त्यांचे किल्ल्यांबाबतचे आकर्षणदेखील वाढणार आहे. परिणामी, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारदेखील मिळण्यास वाढ होणार आहे.

पाच खंडांच्या या प्रकल्पातील पहिला खंड कोकण विभागावर, दुसरा खंड दख्खन पठार व मावळ विभागावर, तिसरा खंड खानदेश - उत्तर महाराष्ट्र विभागावर, चौथा खंड वऱ्हाड - विदर्भ विभागावर आणि पाचवा खंड दख्खन सुभा हा मराठवाडा विभागावर आहे. या खंडांना अनुक्रमे डॉ. जी. बी. शहा, डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ तेजस गर्गे, श्रीपाद चितळे आणि पांडुरंग बलकवडे या अभ्यासकांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. या पाचही खंडांतील अनेक किल्ले आज नामशेष झाले आहेत. काही किल्ल्यांचे अस्तित्व केवळ नावाला उरले आहे. तर महत्त्वाच्या प्रसिद्ध असणाऱ्या किल्ल्यांची अगदी सविस्तर माहिती येथे आपल्याला वाचायला मिळते. त्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान, त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची, त्याचे आधीचे नाव, उपलब्ध इतिहास व गडदर्शन अशा लेखनातून लेखकाची अभ्यासूवृत्ती दिसते. त्यांनी दिलेल्या संदर्भ साधनांवरून अभ्यासकाला व जिज्ञासूला हवी ती माहिती मिळवता येते. नेमके तेच लिहिण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. त्यात कुठेही अभिनिवेश आढळत नाही. लेखनात खानदेशी सरळपणा आहे. लेखकाची भाषा सरळ, सोपी व प्रवाही आहे. जिथे आवश्यक असेल, तेथे संदर्भ व तळटिपा विस्ताराने दिल्या आहेत. त्यावरून आपल्याला नेमका खुलासा होतो. लेखकाने कष्टाने व चिकाटीने ही सर्वंकष माहिती मिळवली आहे. ओघवती भाषा, मुद्देसूदपणा यामुळे हा ग्रंथ सकस झाला आहे.

इतिहास हा राष्ट्राचा प्राण असतो. ऐतिहासिक स्थळे, स्मारके ही केवळ त्या राष्ट्राची बलस्थानेच नसतात, तर ते प्रेरणास्रोतदेखील असतात. त्यामुळेच ५६० किल्ल्यांची माहिती देणारा हा दुर्गकोश अत्यंत महत्त्वाचा आहे. याला 'किल्ल्यांचा एनसायक्लोपीडिया' म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती एकत्रित रूपात देणारा हा पहिलाच महाप्रकल्प आहे. शासनाने संदर्भ ग्रंथ म्हणून यातील धडा पाठ्यक्रमात लावला, तर या ग्रंथाला योग्य न्याय मिळेल असे वाटते. या एकहाती महाप्रकल्पासाठी लेखक डॉ. नि. रा पाटील यांचे त्रिवार अभिनंदन. प्रकाशक नितीन कोत्तापल्ले यांनी हे धाडस केले, याबद्दल तेदेखील अभिनंदनाचे तितकेच हक्कदार आहेत. लेखक प्रकाशक जोडगोळीचे अभिनंदन व या महाप्रकल्पास हार्दिक शुभेच्छा.

संदीप भानुदास तापकीर

(इतिहास अभ्यासक व लेखक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.