लष्कराच्या मध्य कमांडकडून पुनीत बालन यांचा गौरव
लष्कराच्या मध्य कमांडकडून पुनीत बालन यांचा गौरव
उरण (सुनिल ठाकूर )भारतीय लष्करासमवेत विविध उपक्रमात सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले असून भविष्यातही त्यांनी असेच काम करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
७६ व्या लष्कर दिनानिमित्त मध्य कमांड विभागाचे लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी AVSM, SM, VSM (GOC in-C मध्य कमांड) यांच्या हस्ते पुनीत बालन यांना हे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल सैन्य दलाचे सह सेनाध्यक्ष लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते पुनीत बालन यांना असेच प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले होते.
भारतीय लष्कर दलासाठी आवश्यक असलेल्या अनेक सामाजिक कार्यात पुनीत बालन हे नेहमीच अग्रेसर असतात. विशेषत: काश्मीर खोऱ्यात लष्कराबरोबर त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. काश्मीरमधील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराकडून चालविण्यात येणाऱ्या दहा शाळा चालविण्यास घेतल्या असून या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या संवेदनशील भागात आहेत. याशिवाय बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेले डगर स्कूलही भारतीय लष्करासमवेत चालविण्यात येत आहे. तसेच काश्मीरमधील दहशतवादग्रस्त तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कामही पुनीत बालन हे सातत्याने करीत आहेत. त्यांच्या अशाच कार्याचा लष्कारने प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला आहे.
‘‘अहोरात्र देशाची सेवा करणाऱ्या भारतीय लष्कराबाबत आपल्या प्रत्येकाच्याच मनात नितांत आदर, प्रेम आणि अभिमान असतो. याच लष्कराच्या मध्य कमांड विभागाने प्रशस्तीपत्रक देऊन केलेला गौरव ही माझ्यासाठी अत्यंत अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. लष्करासाठी सेवा म्हणून आज खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळत आहे, हे मी माझे नशीब समजतो. ‘नेशन फर्स्ट’ हेच माझे ध्येय असल्याने भविष्यातही भारतीय लष्करासाठी सर्वतोपरी कार्य असेच सुरु राहील.’’
पुनीत बालन- युवा उद्योजक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत