Header Ads

Header ADS

सुंदर अक्षरसुमनांची मोहक काव्यमय गुंफण : जावे गुंफित अक्षरे

 

beautiful-letters-lovely-poetic-intertwined-go-intertwined-letters

सुंदर अक्षरसुमनांची मोहक काव्यमय गुंफण : जावे गुंफित अक्षरे

     साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. त्यातही कविता म्हणजे संवेदनशील मनातील विविध भावनांच्या उद्रेकाचा सहजस्फूर्त अविष्कार असतो. असेच आपल्या अनुभवांना कल्पनेच्या अलंकारांनी सजवून, अर्थाच्या नक्षीने घडवून सादर केलेला सुंदर नजराणा म्हणजे सौ.संध्या भोळे (बोंडे) यांचा 'जावे गुंफित अक्षरे' हा काव्यसंग्रह होय. त्या नवीन पीढी घडविणा-या अतिशय संवेदनशील मनाच्या सृजनशील शिक्षिका आहेत. त्यांना उत्तम कल्पनाशक्ती व उत्कृष्ट प्रतिभाशक्तीही लाभलेली आहे. सतत कार्यमग्न राहून, नवनवीन आत्मसात करून, नव्या युगात सामावून घेण्याची कला कवयित्रीच्या अंगी असल्याने त्यांच्या कविता अतिशय अभ्यासपूर्ण, दर्जेदार शैलीत आपल्यासमोर  आहेत.



साहित्यिक क्षेत्रात मला त्या सुपरिचित असल्याने त्यांची सुरुवातीपासूनची लेखन वाटचाल मी पाहिली आहे. सौ.संध्या भोळे (बोंडे) या  सतत प्रयत्नशील असणारे हे व्यक्तिमत्व सातत्याने लेखन करून सामाजिक जाणिवांचे भान आपल्या लेखनातून जोपासत आहे. त्या अतिशय व्यापक दृष्टिकोनातून त्यांचा साहित्यिक प्रवास 'जावे गुंफित अक्षरे' या १०० कवितांच्या काव्यसंग्रहातून गुंफत आहेत. वयाने लहान असलेल्या ह्या कवयित्रीच्या मनाचा आवाका मोठा आणि अतिशय अनुभवसंपन्न आहे. त्यांच्या कवितांची रचना ही कोणत्याही प्रकारची ओढाताण न करता सहजगत्या गुंफलेली असून त्यांतील यमकसुध्दा अगदी अलगदपणे जुळलेले व कवितांमध्ये बसलेले आहेत.


समाजाच्या सूक्ष्म निरीक्षणातूनच त्यांच्या ह्या समाजभान जोपासणा-या वास्तव कविता निर्माण झाल्या आहेत. प्रमाण मराठी भाषेतील मधुर कवितांसोबतच बहिणाबाईंच्या लेवागणबोलीतील कवितांशी नाते जोडणा-या गोड कविताही ह्या काव्यसंग्रहात आहेत. ह्या कवितांना विषयांचे बंधन नाही. सामाजिक, स्वाभाविक, भावनिक, कौटुंबिक, नैसर्गिक, धार्मिक, अध्यात्म, देशभक्ती, प्रेम, राजकीय असे सारे विषय कवयित्रीने ह्या काव्यसंग्रहात कौशल्याने हाताळले आहेत.


“जावे गुंफित अक्षरे' ह्या शिर्षकीय कवितेत “जावे गुंफित अक्षरे/ जरी होती शब्द वार। तरी गुंफणीत

त्यांच्या। मिळे जीवना आकार//”” असे शब्दांचे फायदे-तोटे दोन्हीही व्यक्त झाले आहेत. 'कळीचे स्वप्न' ही तरुणीच्या अपेक्षा व स्वप्नभंगावरील उत्कृष्ट भावगर्भ कविता आहे. लेखणीचे, शब्दांचे, पुस्तकांचे महत्व “न वाटतो एकांत । कंटाळ्याचे नसे नाव। पुस्तकांच्या दुनियेत/। आनंदाचे गाव//” अशाप्रकारे 'सहवास पुस्तकांचा' प्रतिपादित

करणा-या ,विविध कवितांमधून आत्मविश्वास वृध्दिंगत करीत जगण्याचे बळ वाढवणा-या ह्या बोधप्रद व प्रेरणादायी कविता आहेत. ह्या कवितांमध्ये जशी जेष्ठांची महती 'गावाकडली माती' कवितेद्वारा “जुने मानसं गोळ कनसं।” जशी

सांगितली आहे तशीच बहुविध कवितांमधून ईश्वराची भावभक्तिरूप महतीही गायिली आहे. कवयित्रीला 'ईश्वर रूप' हे दीनदलितांची सेवा करणा-या सेवेक-यांमध्ये दिसले आहे आणि खरोखर तेच खरे ईश्वराचे रूप आहे.


“दाह ग्रिष्माचा' कवितेत बहिणाबाईंच्या अरे संसार संसार कवितेप्रमाणे “आधी झेलता चटके। तव्हा खरं सुख भेटलंय// अशी संसाराची सत्य स्थिती सांगितली आहे. निसर्गातील पंचमहाभूतांना, विविध शक्‍तींना संस्कारी मानवाने देव, देवता मानले आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या निसर्गासंबंधित कवितांमधून येतो व त्या निसर्गाला जोपासण्याचा 'निसर्ग दान' कवितेद्रारा “निसर्गाची ही किमया। मोल जाण माणसा । तुझ्यासाठीच रे ही माया//” असा पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत त्यांना न जोपासल्यास मानवाचा नाश अटळ असल्याचा सावधगिरीचा इशाराही देतात.


पावसाच्या दरवर्षीच्या लहरीपणावर अवलंबून असणारं शेतक-याचं कष्टमय व हलाखीचं जीवन जगणं ह्यावरील त्यांच्या कवितांतून आलेले चिंताजनक भाष्य खरोखरच विचार करायला लावणारे आहे. 'कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी' ह्या मानवाच्या स्वार्थी प्रवृत्तीचं रेखाटन कवयित्रीने आपल्या 'मानूसपन' ह्या कवितेत “आपलं आपलं वयखता। परका 

मानूसबी कामाले येतो/ भारी भरनं सोळी द्या। जो तो रिकामाच जातो//।” अशाप्रकारे 'लेवागणबोलीत करीत पैसा-अडका, मालमत्ता सारे काही येथेच राहते व प्रत्येकजण सोबत काहीच न नेता रिकाम्या

हाताने जातो हे मानवी जीवनाचे अंतिम सत्यही प्रतिपादित केले आहे.


या काव्यसंग्रहातील कौटुंबिक कविता, शेतक-याच्या जीवनावरील कविता ह्या जरी कौटुंबिक दाह, शेतक-याच्या व्यथा, वेदना मांडणा-या आहेत तरी त्या 'माय मही म्हने' कवितेतील “रात अंधाराची पाहू तव्हातं। सकाय चांगली मीईन।//” असा आशावादी संदेश देणा-या कविता ह्यात आहेत. 'आकाश' कवितेतील “वाटेत अनेक अडचणी। तरी त्यांना पार करण्याची। अन आकाश कवेत घेण्याची। मनात धडपड आहे// अशा प्रेरणादायी काव्य ओळी मनाला हुरूप देणा-या आहेत. “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा।।' अशी बालपणच्या सुरम्य व  मधुर आठवणी जागवणारी 'आठवणी' ही कविता “मोठे झाल्यावर कळले आता। स्पर्धेच्या युगात सारे भंगले//”” अशी आजच्या घाईगडबडीच्या पण व्यस्त जीवनातील दगदगीच्या वास्तवाची जाणीवही करून देते. 


जग हे घोड्यावरही बसू देत नाही व पायानेही चालू देत नाही तर उलट त्या घोड्याला डोक्यावर घेऊन

चालण्याचा उलटा सल्ला देते ह्या जगाच्या उफराट्या वृत्तीचे चित्रणही कवयित्रीने लेवागणबोलीत “दुनिया चांगली नी रे भो; संभाईसन वाग/ नही घोडा नही पायी।/ कसा वागशीन सांग//” असे करीत माणसाने आजच्या जगात कसे

वागावे हा ज्वलंत प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसेच 'एकटी मी' कवितेत कववित्रीने “सोशीक सोसतच आहे/” ही सामान्य माणसाची मजबूर स्थिती प्रतिपादित “माणुसकीचे न उरले गाव//”” अशी खंत व्यक्‍त केली आहे. आजच्या स्त्रीभ्रुणहत्त्येच्या काळात लेकीवरील त्यांच्या कविता समाजाचे डोळे उघडणा-या अंजन आहेत. ह्या जगात सतत सावध राहूनच वाटचाल करायची असते असा सावधगिरीचा इशारा ह्यातील काही कविता देतात. सोबतच मानवी मनातील राग, लोभ, द्वेष, असुया, मत्सर अशा कटू भावनांचा निचरा करणा-या आनंददायी व जीवनाभिमुख कविताही ह्यात आहेत. सासर-माहेराच्या उच्च कवितांनी, शुध्द प्रेमभावाच्या प्रेमळ कवितांनी, निसर्गाच्या अनुपम वर्णनाने ह्या काव्यसंग्रहाचे सौंदर्य वाढवलेले आहे. लहान मुलांसाठीच्या संस्कारक्षम व मनोरंजक अशा काही गोड कवितांनी ह्या काव्यसंग्रहाची शोभा वाढवली आहे.


“ज्योतसे ज्योत जगाते चलो' अशाप्रकारे वाचकांना वाचनसाखळीच्या एका कडीतून दुस-या कडीत अगदी अलगदपणे घेऊन जाणारा 'जावे गुंफित अक्षरे' हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजेच सकारात्मक दिशेने असलेली वाटचाल अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. कारण या काव्यसंग्रहामध्ये त्यांची वैचारिक परिपक्वता चांगल्या प्रकारे व्यक्त झालेली दिसते. ह्या कविता नितळ जलासारख्या निर्मळ आहेत. आपल्या दैनंदिन शिक्षकीपेशाचे कार्य दररोज न चुकता प्रामाणिकपणे करीत साहित्यक्षेत्रातील त्यांच्या नेहमीच्या कार्यमग्नतेमुळे त्या भविष्यात साहित्यक्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असतील, यात तीळमात्रही शंका नाही. त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

- प्रा.देवबा शिवाजी पाटील,गोविंदनगर, (नांदुरा रोड, खामगाव.जि.:-बुलडाणा.४४४३०३)  मोबाईल क्र. ९४२०७९५३०७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.