Header Ads

Header ADS

विवेकानंद व्याख्यानमालेचे ६६ वे वर्ष, २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ज्ञानाची गंगा वाहणार

 

Vivekananda-lecture-series-66th-year-from-28-November-to-2-December- Ganga-of-knowledge-will-flow

विवेकानंद व्याख्यानमालेचे ६६ वे वर्ष,

२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ज्ञानाची गंगा वाहणार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आचार, विचार आणि उच्चार यांची हद्द विचारात घेऊन पाऊले टाकणाऱ्यांना कोसळण्याची भीती नसते. खरं म्हणजे माणसांना त्यांच्या मर्यादांचे दर्शन घडविण्याचे काम काही प्रचलित उद्गार करीत असतात. असे म्हणतात की, प्रत्येकाने आपल्याला असणारी माहिती इतरांना द्यावी, असलेल्या ज्ञानाचे दान करावे, पण ज्याचे दान केले ते ज्ञान असावे. ते अज्ञानाचे पेव नसावे. काही विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचे असतात. त्या विषयांबद्दल लोकमानसात उत्कंठा असते. समाजात अशाच उत्कंठावर्धक विषयांवर सामाजप्रबोधन करणारी व गेली ६५ वर्षे अखंड महाराष्ट्राला परिचित असणारी 'विवेकानंद व्याख्यानमाला' अव्याहतपणे सुरू आहे. यंदाच्या ६६ व्या व्याख्यानमालेतील मान्यवर वक्ते ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि जीवनावश्यक विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, विवेचनात्मक आणि ज्ञानवृद्धी करणारी व्याख्यानपुष्प २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान रोज रात्री ८:३० वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई ४०० ०१२. येथे गुंफणार आहेत. 

Vivekananda-lecture-series-66th-year-from-28-November-to-2-December- Ganga-of-knowledge-will-flow


यंदाच्या ६६ व्या विवेकानंद व्याख्यानमालेची सुरूवात २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या 'राज्याभिषेक जाणत्या राजाचा' ह्या व्याख्यानपुष्पाने होणार आहे. इतिहासातील बारकाव्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे मा. बलकवडे ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, शिवचरित्र व्याख्याते, मोडी लिपीतज्ञ, पुरातत्ववेत्ते आणि दुर्ग अभ्यासक म्हणून महाराष्ट्र परिचित आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पेशवे दप्तर पुणे येथील मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केलेले असून पुरातत्ववेत्ते या भूमिकेतून पुण्यातील प्राचीन पुण्येश्वर व नारायणेश्वर मंदिरांच्या अवशेषांचा शोध, कसबा पेठेत चौथ्या शतकातील प्राचीन विष्णू मूर्तीचा शोध तसेच मानवी अवशेषांचा शोध घेऊन सर्व संशोधन लोकाभिमुख केलेले आहे. विवेकानंद व्याख्यानमालेतील आपल्या व्याख्यानातून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक रसिकांसमोर जिवंत करणार आहेत.


२९ नोव्हेंबर रोजी कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्याशी 'मी... वगैरे' विषयावर सिने-नाट्य अभिनेत्री-निवेदिका डॉ. समीरा गुजर-जोशी ह्या सुसंवाद साधणार आहेत. कला आणि मनोरंजन जगतातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे वैभव जोशी. त्यांनी आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांना आपल्या गीतांनी सजवलेले आहे. त्यांच्या कवितेनं अल्पावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी आजवर नामवंत संगीतकारांसोबत आणि गायकांसोबत शेकडो गाणी ध्वनिमुद्रित केलेली आहेत. आशा भोसले, शंकर महादेवन, रेखा भारद्वाज, राहुल देशपांडे, महेश काळे, ऋषिकेश रानडे, बेला शेंडे, वैशाली सामंत अशा पट्टीच्या गायकांनी त्यांच्या कवितांना न्याय दिलेला आहे. वैभव जोशी यांची कलात्मक प्रतिभा आपल्या प्रभावशाली शब्दसमर्थ्याने, सुहास्यमुद्रेने रसिकांच्या मनातील प्रश्न विचारून रसिक श्रोत्यांसमोर उलगडणार आहेत सिने-नाट्य अभिनेत्री-निवेदिका डॉ. समीरा गुजर-जोशी.


३० नोव्हेंबर रोजी विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे 'कुतूहल चांद्रयानाचे!' रसिक श्रोत्यांसमोर उलगडणार आहेत.  अजूनही चांद्रयान-३ या मोहिमेची चर्चा घरोघरी होत आहे.  गुगल किंवा समाज माध्यमातुन येणाऱ्या माहितीबाबत बऱ्याचदा मनामध्ये संदिग्धता असते. मात्र, मयुरेश प्रभुणे हे अगदी सोप्या आणि साध्या भाषेत आपल्याला या मोहिमेची आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या प्रगतीची माहिती देणार आहेत. 


विवेकानंद व्याख्यानमालेचे चौथे पुष्प उद्योजक, प्रशिक्षक महेंद्र शिंदे 'नव्या युगाचे नवे पालक' या विषयाच्या माध्यमातून १ डिसेंबर रोजी गुंफणार आहेत.  महेंद्र शिंदे हे उद्योजक व कार्पोरेट प्रशिक्षक आहेत गेल्या १७ वर्षापासून ते प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. त्यांनी ३,००० हून अधिक कार्पोरेट ऑफिस, उद्योजक तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना आणि इतर संस्थांना प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग आजवर एक लाख पेक्षा जास्त उद्योजकांना करून दिला आहे. मलेशिया, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया व कॅनडा येथे झालेल्या विविध परिषदेमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे.


अवघ्या युवा पिढीचे भवितव्य घडवणारी भारतीय शिक्षण पद्धती परिवर्तनाच्या एका मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. 'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०' हे भारतीय शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करू पाहत आहे. हा धोरणात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींवर आहे त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी. २ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू 'नवीन शैक्षणिक धोरण - संधी आणि आव्हाने' या विषयातून पाल्य आणि पालक यांच्या मनातल्या संभ्रमावस्थेची उकल करणार आहेत.


विवेकानंद व्याख्यानमालेच्या या समाज प्रबोधनाच्या अखंड वारीत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका देणगी शुल्क अवघे ३० रूपये आहे. तेही संपूर्ण व्याख्यानमालेसाठी. प्रवेशिका मिळवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ८५९१५८१०३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.