Header Ads

Header ADS

संगीत-बालनाट्य, नृत्यनाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरावटीवर पु. ल. कला महोत्सव २०२३ची सुरेल सांगता


Music-children's-drama-dance-as well as-classical-music-on-the-suravaty-of-Pu-L-Kala-Festival-2023-Melodious-Sangat


संगीत-बालनाट्य, नृत्यनाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरावटीवर पु. ल. कला महोत्सव २०२३ची सुरेल सांगता


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सव २०२३ च्या सहाव्या दिवशी सकाळी ६.३० वा. अभ्यंग संगीत साधना महोत्सव - दीपावली पहाट हा कार्यक्रम सादर झाला. पं. शैलेश भागवत यांच्या सुंदर सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांचा शास्त्रीय संगीताचा सुरेल कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमास विशेष अतिथी पं. डॉक्टर राम देशपांडे उपस्थित होते.


यानंतर नवीन लघुनाट्यगृह येथे बाल दिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देऊन कलांगण मुंबई या संस्थेने फुलवा मधुर बहार हे संगीत बालनाट्य सादर केले.

आपल्या आजूबाजूला बागेत अनेक फुलझाडं असतात. प्रत्येक फुलाचा एक अनोखा रंग आणि विशिष्ट गंध असतो. प्रत्येक फुलाला आपल्या सुगंधाचा रंगाचा एक वेगळा अभिमान असतो एकमेकांत मतभेद असतात या संकल्पनेवर आधारित लहान मुलांनी वेगवेगळ्या फुलांची भूमिका, त्यांच्यातील संवाद, सुंदर वेशात आणि आपल्या सुमधुर गाण्यांनी हे नाट्य साकारून सर्व फुलांनी एकत्र येऊन नेहमी मधुर बहार फुलवत रहावा हा सुंदर संदेश 'फुलवा मधुर बहार' या संगीत बालनाट्यातून देण्यात आला. या बालनाट्याचं दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांनी केलं. तसेच वाद्यसंयोजन आणि पार्श्वसंगीत कमलेश भडकमकर यांचं होतं. नृत्य रचना- सायली महाडिक, व्यवस्थापन- शैलेश सामंत तसेच कलांगणच्या १३ बालकलाकारांनी हा सुंदर नाट्यप्रयोग सादर केला.


या कार्यक्रमास नुकताच प्रदर्शित झालेला 'श्यामची आई' या चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ आणि चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव उपस्थित होत्या त्यांनी कार्यक्रमाबाबतीत आपलं मनोगत व्यक्त करून सर्व बालकलाकारांचे कौतुक केले.


यानंतर सायंकाळी ५ वा. सोनिया परचुरे यांचा भारतीय आणि पुराणातील देवी-देवतांवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर अभ्यंग संगीत साधना महोत्सव 'भगवती' हा कार्यक्रम नृत्य नाट्यातून सादर झाला. आध्यात्मिक कथानकातील सीतेच अपहरण, रावणाचा वध, शंकर पार्वती विवाह, देवीचा गोंधळ अशा अनेक घटनांवर आधारित अप्रतिम असा अभिनय नृत्याविष्कार परचुरे आणि सह कलाकारांनी सादर केला.


यानंतर पु. ल. कला महोत्सवाचा शेवटचा कार्यक्रम विदुषी कलापिनी कोमकली यांचा अभ्यंग संगीत साधना महोत्सव 'दीपावली संध्या' सादर झाला. शास्त्रीय संगीतातील बहारदार गाणी 'आज मी रुसून आहे', 'खुलता कळी खुलेना...', 'सावरिया ऐ्जैओ' अशा अप्रतिम गाण्यांनी विदुषी कलापिनी कोमकली यांनी दाद मिळवली. कार्यक्रमास विशेष अतिथी पं. अमरेंद्र धनेश्वर उपस्थित होते. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शुभंकर करंडे, राजुली सुभाष आणि निमिषा वालावलकर यांनी पु. ल. कला महोत्सवाचे सुत्रसंचालन केले.

संगीत बालनाट्य नृत्य नाट्य तसेच शास्त्रीय संगीताच्या सुरेल गायनाने पु. ल. कला महोत्सवाचा शेवटचा दिवस सांगितीक वातावरणात पार पडला. रसिकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण महोत्सवाला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.