जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणेचा लौकिक धुळीस मिळाला; हमासकडून मोसादचा मानभंग
जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणेचा लौकिक धुळीस मिळाला; हमासकडून मोसादचा मानभंग
लेवाजगत न्युज:-: ‘मोसाद’ या आपल्या गुप्तचर यंत्रणेचा इस्रायलचे सत्ताधारी, लष्कर, सर्वसामान्य नागरिक कमालीचा अभिमान बाळगतात. ‘शिन बेट’ ही गुप्तचर यंत्रणेची तुकडीही इस्रायससाठी मिरवण्याची गोष्ट. मात्र हमासने केलेल्या सर्वंकष हल्ल्यानंतर या दोन्ही गुप्तचर यंत्रणाचे अपयश ढळढळीतपणे पुढे आले असून, आता इस्रायलमधील सत्ताधारी अपेक्षेप्रमाणे या यंत्रणांवर प्रश्नांची सरबत्ती करू लागले आहेत.
गंधवार्ताच नाही
इस्रायलवर शनिवारी झालेला भीषण हल्ला संपूर्ण इस्रायलला हादरवून टाकणारा ठरला आहे. इतक्या मोठ्या हल्ल्याची तयारी हमास दीर्घ काळापासून करीत असणार. असे असताना इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांना त्याची गंधवार्ताही लागली नाही, हे या यंत्रणांचे मोठे अपयश मानले जात आहे.
सर्व बाजूंनी हल्ला
भूमार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग... असा सर्व बाजूंनी इस्रायलवर हल्ला झाला. अत्यंत बलशाली सैन्य, कडेकोट सीमेवर जागोजागी असलेला कॅमेरे, कुंपण, अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा असा सगळा जामानिमा असतानाही ‘हमास’ने तो भेदत हल्ला केला. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी कशा ठरल्या, ही चर्चा सुरू आहे.
अंगणातील घडामोडी दुर्लक्षित
इराणशी सातत्याने सुरू असलेल्या कुरबुरी आणि त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम हाणून पाडण्याची धडपड यांकडे इस्रायल इतके लक्ष देत राहिला की प्रत्यक्ष आपल्या अंगणात काय चालले आहे, याकडे त्याचे दुर्लक्ष झाले, असे काही संरक्षणतज्ज्ञ म्हणत आहेत. तीन-चार वर्षांत हमासची ताकद कमी झाली आहे, असा भ्रम इस्रायलच्या लष्करात पसरला होता. त्यामुळेच आज ही वेळ ओढवली, असा मुद्दा इस्रालयमधील काही वर्तमानपत्रांनी मांडला आहे.
अंदाजच आला नाही
हमासने काही गडबड केली की तेवढ्यापुरती कारवाई व्हायची व पुढे सगळे आलबेल चालले आहे, असा कारभार चालायचा. मात्र हमास आपली ताकद दरम्यानच्या काळात वाढवत चालला होता, हे इस्रायली गुप्तचरांच्या लक्षातच आले नाही, असाही मुद्दा आता मांडला जात आहे. त्याचबरोबर, इस्रायलमधील राजकीय दुहीचा परिणाम देखील लष्कराच्या, गुप्तचर यंत्रणांच्या एकंदर क्षमतेवर झाला आहे, असेही आता टीकाकार म्हणू लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत