राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना जामीन मंजूर !
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना जामीन मंजूर !
लेवाजगत न्युज मुंबई:- भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांना आज पीएमएलए न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
एकनाथराव खडसे हे राज्याचे महसूलमंत्री असतांना भोसरी औद्योगिक वसाहतीतील एक भूखंडाच्या खरेदीचे प्रकरण खूप गाजले. खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून आपली पत्नी व जावयाला लाभ मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा तर द्यावा लागलाच पण या संदर्भात त्यांच्यावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला. तर गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने देखील याची चौकशी सुरू केली आहे.
ईडीच्या गुन्ह्यात एकनाथराव खडसे यांना कोर्टाने दिलेल्या अंतरीम जामीनाची मुदत ही सोमवारी संपली होती. तर याच दिवशी हायकोर्टाने एसीबीच्या चौकशीस स्थगिती देण्याला नकार दिला होता. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे मानले जात होते. दरम्यान, याच प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी पीएमएलए न्यायालयात दाद मागितली होती.
यावर आज मुंबई येथील पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. यात एकनाथराव खडसे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन नियमीत असून यासाठी काही अटी देण्यात आल्या असल्याची माहिती खडसेंच्या वकिलांनी दिली आहे. तर, मंदाताई खडसे यांनी देखील नियमीत जामीनासाठी अर्ज दाखल केला असून यावर उद्या सकाळी पीएमएलए न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पीएमएलए न्यायालयाच्या या निकालामुळे आमदार एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात देखील ते सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत