पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी 2 जणांना बेड्या
पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी 2 जणांना बेड्या
लेवाजगत न्युज पुणे:-पुण्यात सध्या गुन्हेगारी आणि बेसुमार वाहन (Pune Crime News) चालवणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. भरधाव कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू प्रकरणात कार चालकासह साथीदारावर गुन्हा दाखल केला. अपघातावेळी कार चालक आणि साथीदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
भरधाव कारने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता वाजता पुण्यातील झेड ब्रीज जवळ घडली होती. वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबूराव सूर्यवंशी (वय 44) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजता केळकर रस्त्यावरून भरधाव कार टिळक चौकाकडे चालली होती. बाबा भिडे पुलाजवळील चौकापासून काही अंतरावर भरधाव कारने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्याजवळ पाच ते सहा वाहनांना धडक दिली. त्यावेळी पादचारी विश्वनाथ राजोपाध्ये यांना कारची जोरात धडक बसली आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला.या अपघातात एक कार, दोन रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. यानंतर पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं गेलं.
संतोष माने प्रकरणाची आठवण
पुण्यात घडलेल्या या घटनेने 2012 सालच्या संतोष माने प्रकरणाची आठवण करून दिली. 25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत मनोरुग्ण असलेल्या संतोष मानेनं 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते.
संतोष माने हा मूळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा होता. ड्रायव्हर म्हणून 13 वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. 25 जानेवारी 2012 रोजी त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्यानं 9 जणांना चिरडलं होतं, तर 37 जण जखमी झाले होते. शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत