विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्ध सलग ८वा विजय; एक लाख प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचा पराभव करत गुणतालिकेत गाठले अव्वल स्थान
विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्ध सलग ८वा विजय; एक लाख प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचा पराभव करत गुणतालिकेत गाठले अव्वल स्थान
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा तिसरा सामना पाकिस्तानशी होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानचा संपूर्ण डाव ४२.५ षटकांत केवळ करत १९१/१० संपवला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत तीन गडी गमावून १९२ धावांचे लक्ष्य गाठले. विश्वचषक २०२३ मध्ये भारताने विजयी हॅटट्रिक नोंदवली. विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. विश्वचषकामध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत, मात्र चांगल्या नेट रनरेटच्या आधारे रोहित शर्माचा संघ पहिल्या स्थानावर आहे. भारताचा निव्वळ धावगती +१.८२१ वर पोहोचला. त्याचवेळी, न्यूझीलंडचा निव्वळ धावगती +१.६०४ आहे. पाकिस्तान चार गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला, परंतु त्यांची निव्वळ धावगती -०.१३७ वर घसरली. टीम इंडियाचा पुढचा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. तर पाकिस्तानचा संघ २० तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
पाकिस्तानकडून मिळालेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेंग्यूमधून बरा झालेला शुभमन गिल ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकरवी झेलबाद केले. शुभमन फॉर्ममध्ये दिसत आहे आणि आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ही चांगली बातमी आहे. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली खेळपट्टीवर आला. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पण पाकिस्तानविरुद्ध विराट विशेष काही करू शकला नाही. त्याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. हसन अलीच्या गोलंदाजीवर मोहम्मद नवाजकडे झेल देऊन तो बाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर खेळपट्टीवर आला. श्रेयसने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली.
रोहित शर्माला सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने १३१ धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती, मात्र त्याला तसे करता आले नाही. रोहित ६३ चेंडूत ८६ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १३६.५१ होता. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला.
रोहित शर्मानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचा सामना संपवला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ३६ धावांची नाबाद भागीदारी केली. अय्यरने चौकार मारून, त्याचे अर्धशतक झळकावले आणि सामना संपवला. ६२ चेंडूंत ५३ धावा करून तो नाबाद राहिला. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. केएल राहुलने २९ चेंडूत १९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याच्या बॅटमधून दोन शानदार चौकार आले.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर तंबूमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.
टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही. जसप्रीत बुमराहने सात षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत