Header Ads

Header ADS

दसऱ्या आधीच झेंडूचा भाव कोसळला! उत्पादकांच्या पदरी निराशा, मुंबई, नाशिक, नगरला फुलांचे दर काय? दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाल्याने फुल उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे


 दसऱ्या आधीच झेंडूचा भाव कोसळला! उत्पादकांच्या पदरी निराशा, मुंबई, नाशिक, नगरला फुलांचे दर काय? 
 दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाल्याने फुल उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे

लेवाजगत न्युज नाशिक : दसरा म्हटला की फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो. त्यामुळे फुलांना (Flowers Rate) अनन्यसाधारण महत्व असते. दसरा काही तासांवर येऊन ठेपला असून फुलांना मागणी वाढली आहे. झेंडूसह शेवंती, गुलाब यासह विविध फुले बाजारात आली आहेत, मात्र यंदा झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून झेंडूचे दर घसरले आहेत. तर अन्य फुलांच्या किंमती जैसे थे असल्याचे चित्र आहे. 

दसऱ्यासह दिवाळीला (Diwali) फुलांना मोठी मागणी असते. याच काळात शहराच्या आजूबाजूला फुलांची शेती बहरलेली दिसून येते. घराघरात फुलांच्या माळा, सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो. त्याचमुळे दसरा आणि दिवाळीत फुलांची मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतात. मात्र यंदा झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. एकीकडे नवरात्री (Navratri) सुरु असल्याने फुलांची मागणी वाढली असून बाजारात झेंडूच्या फुलांची अवाक वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा दर घसरला असून नाशिकमध्ये केवळ 15 ते 30 रुपये किलो दराने झेंडू विकला जात आहे. तर मुंबईमध्ये 80 ते 100 रुपये किलो असा दर तर अहमदनगरमध्ये देखील 30 ते चाळीस रुपये किलो दराने झेंडू विकला जात आहे. 

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) मनमाड बाजार समितीमध्ये (Manmad Bajar samiti) विक्रीसाठी आलेल्या झेंडूच्या फुलांना प्रति किलोला अक्षरश 10 ते 15 रुपये असा कवडीमोल भाव मिळाल्याने फुल उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दसरा दिवाळी गोड होईल या आशेने शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार शिल्लक पाण्यावर फुल शेती जगविली होती. मात्र फुलांना मिळत असलेल्या भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले झाल्याने फुल विक्रीतून दसरा- दिवाळी सण गोड होण्याचे बळीराजाचे स्वप्न भंगले आहे. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये जवळपास दीडशे झेंडूच्या फुलांच्या वाहनांची आवक झाली होती. नाशिक शहरातील फुलबाजार (Nashik Flowers) फुलांनी बहराला असून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी केली आहे. 

अहमदनगरला फुलला बाजार 

तर विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर (Ahmednagar) शहरातील फुलांच्या मार्केटमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडू, शेवंती, अष्टर , गुलाब फुलांचे दर वाढत असतात. मात्र अहमदनगरच्या बाजरात झेंडूचे दर पडले असल्याचे पाहायला मिळत आहेत. कालपर्यंत 60 किलो दर असलेल्या झेंडूला आज 15 ते 30 रुपये किलो दर मिळत आहे. तर शेंवती 100 ते 120 किलो, गुलाब 300 ते 500, अष्टर 120 ते 150 तर गुलछडीला 250- 300 रुपये किलो दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हंटले आहे...यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे फुलांचे नुकसान झाले नाही, परिणामी बाजारात फुलांची आवक वाढली आहे. त्यातच दसरा डोळ्यासमोर ठेऊन एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात फुलांची तोडणी केली. त्यातच बाहेरच्या जिल्ह्यातूनही फुलांची आवक झाली असल्याने दर पडल्याचे सांगण्यात आले आहे.


धुळ्यात झेंडूला मागणी 

धुळे जिल्ह्यात (Dhule) सध्या मोठ्या प्रमाणात फुलांची आवक सुरु आहे. ही आवक नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून होत आहे. यामुळं एकीकडे फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना फुले खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. राज्यातील बहुतांश शेतकरी आता पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्यानं बाजारात फुलांची आवकही 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळं फुलांचे भाव वाढले आहेत. झेंडूला किलोला 80 ते 100 रुपयांचा दर मिळत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.