दहावीतील 35 विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण, पालघरमधील महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार
दहावीतील 35 विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण, पालघरमधील महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार
लेवाजगत न्युज पालघर:-तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावी इयत्तेतील पस्तीस विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.
अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना बोलवून घेतलं. तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत, असं सांगून सर्वांना बोलावलं गेलं. तिथे सर्व विद्यार्थी गेल्यावर त्यांना सूचना देण्यात आल्या, जे विद्यार्थी विद्यालयात उशिरा आले त्यांना उभं राहा असं सांगण्यात आल्यावर उशिरा आलेले विद्यार्थी उभे राहिले. प्रत्येकाला बोलावून गालावर सात ते आठ वेळा जोरात मारण्यात आलं. त्यातील एका विद्यार्थ्यांचा गुप्तांगांवर गुडघ्यानं मारण्यात आल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.
तुमचं शर्ट इन नसतात तुम्ही बुट घालत नाही, मेसमध्ये आवाज असतो, तुम्ही जेवायला येत नाहीत, ही कारणं सांगण्यात आली. मात्र तेही या गोष्टी पाळत नाहीत नियम फक्त आम्हीच पाळायचे का? त्यांनी नाही का? असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी बोलताना उपस्थित केला आहे. हा प्रकार रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडल्यानंतर रात्री बारा वाजता आम्हाला आमच्या रूमवर पाठवलं आणि पुन्हा दुसरं कारण सांगून रात्री बारा ते एकपर्यंत काही मुलांना तुम्ही तेव्हा का उभे राहीलात नाहीत? असा प्रश्न विचारत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.तसेच, झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगायचं नाही असा दम विद्यार्थ्यांनी त्यांना भरला.
विद्यार्थ्याच्या कानाला इजा झाल्यानं प्रकार उघड
एका विद्यार्थ्यांचा कान जास्त दुखू लागल्यानं विद्यालयातील नर्सकडे गेले असता कानाला झालेली दुखापत बघून नर्सनं मुलांच्या आई वडिलांना बोलावून घ्या आणि डॉक्टरांकडे त्याची तपासणी करा, असे सांगण्यात आलं यावेळी पालक डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी तपासणीनंतर कोणी मारलंय का? काही झालंय का? असे प्रश्न विचारले. तेव्हा हा प्रकार उघड झाला. पुन्हा असा प्रकार घडू शकतो, या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत पालकांना कळवलं नव्हतं, असं विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलं.
हॉस्पिटलमधून विद्यार्थी विद्यालयात आल्यावर याची तक्रार प्राचार्यांकडे करण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रकार चुकीचा असून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आता तुम्ही परीक्षा असल्यामुळे परीक्षेची तयारी करा, असे उत्तर प्राचार्यांनी त्यावेळी विद्यार्थ्यांना दिले.
दहावी इयत्तेतील निखिल सिंह यांच्या कानावर सात ते आठ वेळा मारण्यात आलं असून त्याच्या कानाचा पडदा फाटण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या औषध उपचारावर फरक पडतो का? हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी जर फरक पडला नाही तर आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येणार नाही, अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्या कानावर शस्त्रक्रिया करू, असं सांगितल्याचं त्याचे पालक नेपाल सिंह यांनी बोलताना सांगितलं आहे.
विशाल कुशवा आणि सुशांत सोनकर यां विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात आले, यात विशालचा कान सुजला होता. तर सुशांत सोनकर त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली कौस्तुभ मोरे यालाही जबर मारहाण करण्यात आल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं. जवाहर नवोदय विद्यालय पालघर येथे पालघर व ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते वास्तव्यास तिथेच असतात रात्रीच्या वेळेस मुलांना बोलावून बेदम मारहाण करण्यात येते मात्र या घटनेबद्दल शाळा व्यवस्थापनाला कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही मुलांना झालेली इजा जर शाळा व्यवस्थापनास कळत नसेल तर ते नक्की करतात काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दहावीच्या पालकांनी पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नसल्याचा निर्णय घेत या मुलांना शाळा व्यवस्थापनाने समज देऊन दहा ते पंधरा दिवस त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी, अशा प्रकारच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला पालकांनी केल्या. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. त्याचा रिपोर्ट तयार झाला की, इनडोअर समिती त्याच्यावर निर्णय घेईल आणि दोषी विद्यार्थ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य इब्राहम जॉन यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत