Header Ads

Header ADS

विश्वचषक : सराव सामन्यात पाकिस्तानच्या ३४५ धावा तरीही न्यूझीलंड विरुद्ध पराभव; बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला


Pakistan's-345-runs-still-lost-against-New Zealand-Bangladesh-defeated-Sri Lanka-in-world-cup-practice-match


 विश्वचषक : सराव सामन्यात पाकिस्तानच्या ३४५ धावा तरीही न्यूझीलंड विरुद्ध पराभव;  बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आता एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. शुक्रवारपासून या स्पर्धेसाठी सराव सामने सुरू झाले.  अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.  त्याचवेळी बांगलादेशने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. अन्य एका सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव स्वीकारावा लागला.

    श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना


हा सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे झाला.  श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  बांगलादेशचा नियमित कर्णधार शकिब अल हसन या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्या जागी मेहदी हसन मिराज कर्णधार होता. श्रीलंकेचा संघ ४९.१ षटकांत सर्वबाद २६३ धावांवर आटोपला. पथुम निसांका ६८, कुसल परेरा ३४, कुसल मेंडिस २२, सदिरा समरविक्रमा १८, धनंजय डी सिल्वा ५५, कर्णधार दासुन शनाका ३, दिमुथ करुणारत्ने १८, डुनिथ वेलालगे १०, डुनिथ वेललागे १०, डुनिथ ११ तर  लाहिरू कुमारा १३ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून मेहदी हसनने सर्वाधिक तीन बळी घेतले.  तंजीम हसन, शोरीफुल इस्लाम, नसुम अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


प्रत्युत्तरात बांगलादेशने ४२ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.  तनजीद हसनने ८४ आणि लिटन दासने ६१ धावा केल्या. तौहीद हृदयाला खातेही उघडता आले नाही.  कर्णधार मेहदी मिराजने ६७ धावांची नाबाद खेळी तर मुशफिकर रहीमने ३५ धावांची नाबाद खेळी खेळली.  लाहिरू, वेललागे आणि हेमंथा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


*न्यूझीलंडने विरुद्ध पाकिस्तान सामना*


हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडविरुद्ध ५० षटकांत ५ बाद ३४५ धावा केल्या. रिझवानने १०३ धावा करत शतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. तो दुखापतीमुळे निवृत्त झाला. त्याचवेळी कर्णधार बाबर आझमने ८० धावांची अर्धशतकी खेळी खेळली, ज्यात त्याने ८४ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्याच्याशिवाय सौद शकीलनेही अर्धशतकी खेळी खेळली. त्याने ५३ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह ७५ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने १४, इमाम उल हकने एक आणि आगा सलमानने नाबाद ३३ धावा केल्या. इफ्तिखारही सात धावा करून नाबाद राहिला.  न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक दोन बळी घेतले. मॅट हेन्री, नीशम आणि फर्ग्युसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


प्रत्युत्तरात न्यूझीलंडने अवघ्या ४३.४ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. रचिन रवींद्रने ७२ चेंडूत ९७ धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने १६ चौकार आणि एक षटकार लगावला. डेव्हॉन कॉनवे खाते उघडू शकला नाही. केन विल्यमसनही फलंदाजीला आला आणि ५० चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. डॅरिल मिशेलनेही दुखापतग्रस्त होण्याआधी ५७ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या.


या सामन्यात कर्णधार असलेला टॉम लॅथम १८ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्स तीन धावा करून बाद झाला. जेम्स नीशम ३३ धावा करून बाद झाला. त्याचवेळी, मार्क चॅपमन ४१ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून नाबाद राहिला आणि मिचेल सँटनर एक धाव काढत नाबाद राहिला.  पाकिस्तानकडून उसामा मीरने सर्वाधिक दोन बळी घेतले. तर हसन अली, सलमान आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही सामन्यात दुसर्‍या डावात फलंदाजी करणारा संघ सामना जिंकला हे विशेष.

उद्या (३० सप्टेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला सामना दुपारी २ वाजता गोवाहाटी आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स सामना त्याचवेळी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.