भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० विकेटने केला पराभव
भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० विकेटने केला पराभव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत आठव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव १५.२ षटकांत ५० धावांवर आटोपला. मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ६.१ षटकांत म्हणजे अवघ्या ३७ चेंडूत जिंकला. शुभमन गिल १९ चेंडूत २७ धावा आणि इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद राहिले.
भारताने कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये शिल्लक चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये २६३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २००३ मध्ये सिडनी येथे झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडविरुद्धचा सामना २२६ चेंडू राखून जिंकला होता.
यापूर्वी टीम इंडियाने २००१ मध्ये ब्लोमफॉन्टेन येथे केनियाविरुद्धचा सामना २३१ चेंडू शिल्लक असताना जिंकला होता. एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये संघाने १० गडी राखून सामना जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी टीम इंडियाने १९९८ मध्ये शारजाहमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि २००३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक २०२३ ची अंतिम फेरी हा चेंडूंच्या बाबतीत एकदिवसीय इतिहासातील तिसरा सर्वात लहान सामना आहे. या सामन्यात दोन्ही डावांसह एकूण 129 चेंडू टाकण्यात आले. या बाबतीत सर्वात वर नेपाळ विरुद्ध अमेरिका सामना आहे. हा सामना 2020 मध्ये कीर्तीपूर येथे खेळला गेला आणि या सामन्यात एकूण 104 चेंडू टाकण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे सामना आहे. हा सामना 2001 मध्ये झाला होता. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात 120 चेंडू टाकण्यात आले होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कुसल मेंडिस १७ तर दुशान हेमंताला १३ धावा करता आल्या. श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये कुसल परेरा, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, दासुन शनाका आणि मथिशा पाथिराना यांचा समावेश आहे. पथुम निसांका दोन धावा, धनंजय डी सिल्वा चार धावा, दुनिथ वेलल्गे आठ धावा आणि प्रमोद मदुशन एक धाव करू शकले. सिराजने सामन्यात कहर केला. चौथ्या षटकात त्याने चार बळी घेतले. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. यानंतर सादिरा समरविक्रमाला तिसऱ्या चेंडूवर पायचीत केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचवा चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने सहाव्या षटकात दासुन शनाका आणि बाराव्या षटकात कुसल मेंडिसला बाद केले. हार्दिक पांड्यानेही तीन बळी घेतले. त्याने दुनिथ वेललागे, मदुशन आणि पाथिराना यांच्या विकेट घेतल्या. बुमराहने परेराला तंबूमध्ये पाठवले होते. श्रीलंकेच्या सर्व १० विकेट भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.
सिराजने २१ धावांत सहा विकेट घेत श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. सिराजने या दरम्यान पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूसला मागे टाकले. वकारने १९९० मध्ये शारजाहच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २७ धावांत सहा विकेट घेतल्या होत्या.
त्याचवेळी हार्दिकने २.२ षटकांत तीन धावा देऊन तीन बळी घेतले, तर बुमराहने पाच षटकांत २३ धावांत एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताने ६.१ षटकांत १० विकेट्स राखून सामना जिंकला. या स्पर्धेत वेगवान गोलंदाजांनी एका डावात सर्व १० बळी घेण्याचा पराक्रम पाकिस्तान आणि भारत या दोन्ही संघांनी केला.
१५.२ षटके ही एकदिवसीय अंतिम फेरीत सर्वबाद होण्यासाठी संघासाठी सर्वात कमी षटके आहेत. या बाबतीत श्रीलंकेने आपलाच विक्रम मागे टाकला. २००२ मध्ये शारजाहमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला १६.५ षटकात बाद केले होते.
सिराजला सामनावीर तर कुलदीप यादवला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सिराजने त्याच्या बक्षिसाची रक्कम मैदानाची निगा राखणार्या खेळाडूंना सुपूर्द करून चाहत्यांची मने जिंकली. ५००० डॉलर्स (सुमारे ४.१५ लाख रुपये) बक्षीसाची रकम मिळाली होती.
मागच्या ८ वर्षांत तिसर्यांदा आशिया चषक जरी भारतीय संघाने जिकला असला तरीसुद्धा २०१८ नंतर त्यांना विजयासाठी २०२३ पर्यंत वाट पहावी लागली. २०२२ च्या स्पर्धेत भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नव्हता. त्यावेळी श्रीलंकेने पाकिस्तान संघाला पराभूत करत सहाव्यांदा आशिया चषक उंचावला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत