चिनावलच्या तरुणाचा मुक्ताईनगरजवळ खून
चिनावलच्या तरुणाचा मुक्ताईनगरजवळ खून
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर -शहरातील नवीन मुक्ताई मंदिरा मागे सातोड शिवारातील बोदवड रस्त्यावर चिनावल (ता. रावेर) येथील तरुणाचा निर्घृण खून झाला. ही घटना ६ जून रोजी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. अद्याप मारेकरी पसार असून खुनाचे कारण गुलदस्त्यात आहे. रवींद्र मधुकर पाटील (वय ४६) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी योगेश मधुकर पाटील (धंदा शेती, वय ४०, रा. चिनावल) यांनी फिर्याद दिली. त्यात ६ जून २०२३ रोजी दुपारी २ वाजेपूर्वी सातोड शिवारात मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यालगत वृंदावन हॉटेलजवळ दगड व टणक वस्तू, हत्याराने मारहाण करून रवींद्र मधुकर पाटील याचा खून करण्यात आला. अज्ञात आरोपींनी त्यांचे तोंड, डोके, नाक व चेहऱ्यावर जबर मारहाण केली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, डीवायएसपी राजकुमार शिंदे, परीविक्षाधीन डीवायएसपी सतीश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय संदीप दुणगहू, उपनिरीक्षक संदीप खेडे यांच्यासह फॉरेन्सिक पथक दाखल झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास संदीप दुणगहू करत आहे. मृत रवींद्र हा चिनावल येथील रहिवासी असून एका पतसंस्थेत ऑडिटर होता. विवाहित असलेल्या रवींद्रला एक अपत्य आहे. त्याची दुचाकी मुक्ताईनगर शहरात आढळली. दरम्यान, तो मुक्ताईनगर येथे कशासाठी आला? त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याबाबी अद्यापही गुलदस्त्यात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत