हिंदुत्ववादी संघटनेकडून धुळे बंदची श्रीराम मंदिर विटंबणे प्रकरणी हाक
हिंदुत्ववादी संघटनेकडून धुळे बंदची श्रीराम मंदिर विटंबणे प्रकरणी हाक
लेवाजगत न्यूज धुळे -शहरातील मोगलाई परिसरातील श्रीराम मंदिरात झालेल्या विटंबना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतर घटनांविषयी काही जण आक्षेपार्ह विधान करत आहे. ही बाब लक्षात घेऊन समाजात शांतता, एकोपा कायम राहावा यासाठी गणेशोत्सवापर्यंत प्रत्येक कॉलनीत जाऊन प्रबोधन केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले की, मंदिरातील विटंबना प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सागर पिंपळे नामक संशयिताने हा गुन्हा घडवल्याचे पुढे आले आहे. मध्यरात्री १२ ते २ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. तिघा संशयितांच्या मोबाइलचा डीव्हीआर तपासला जातो आहे. या गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढू शकते. तसेच काही दिवसांपासून शहरात आक्षेपार्ह विधान केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत शांतता, एकात्मता व पोलिस मित्र संकल्पनेवर जागृती केली जाणार आहे. वडजाई रोडवरील टिपू सुलतान चौकाच्या कामाला नियमानुसार परवानगी होती की नाही याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई होईल, असेही पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले.
हिंदुत्ववादी संघटनांची बैठक : मंदिरातील विटंबना प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांची बुधवारी रात्री बैठक झाली. या वेळी विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यात आला. बैठकीत महेश मिस्तरी, संदीप सूर्यवंशी, सुनील बैसाणे, अॅड. रोहित चांदोडे, प्रा. पाटील, भाऊसाहेब जाधव यांच्यासह विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, हिंदू युवा शक्ती संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या घटनेमुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.
यापूर्वीही उपद्रव
या मंदिरात यापूर्वीही विजेचे दिवे फोडणे, अस्वच्छता करणे, मंदिराच्या बाहेर बसून मद्यपान करणे असे प्रकार घडले आहे. गेल्यावर्षी परिसरातील अन्य एका मंदिरातील मूर्तीचे चांदीचे डोळे चोरीस गेले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी काढणार मोर्चा : या घटनेच्या निषेधार्थ १० जूनला बंद ठेवण्याचे ठरले. तसेच सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्याचे बैठकीत ठरल्याची माहिती हिंदू युवा शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत