म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून; कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा
म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून; कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा
लेवाजगत न्यूज मुंबई:-म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकचl कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार असून गुरुवार, ५ जानेवारीपासून नोंदणीस सुरुवात होणार आहे.म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे सोडतीत विजयी होणाऱ्याला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येईल.
म्हाडाच्या घरासाठी आता एकच कायमस्वरूपी नोंदणी करावी लागेल. कोणीही इच्छुक आता नोंदणी करू शकतो. एखाद्याला ज्या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे ती जाहीर झाल्यानंतर त्याला अर्ज करता येईल. या नोंदणीचा प्रारंभ गुरुवारपासून होणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी याला दुजोरा दिला आहे.
नोंदणी अशी..
एकाच कायमस्वरूपी नोंदणीस गुरुवार, ५ जानेवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. नव्या बदलानुसार, आता नोंदणी करतानाच इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. सामाजिक आणि इतर आरक्षित गटांतील इच्छुकांना संबंधित प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत