Header Ads

Header ADS

जगात पुन्हा कोरोनाचे सावट भारतात लॉक डाऊन पुन्हा लागणार का? चीन कोरोनातअपयशी,मृतदेहांचा खच, मृत्यूची आकडेवारी गोळा करणेही बंद

The-world-again-the-corona-will-be-locked-down-in-India-again?


जगात पुन्हा कोरोनाचे सावट भारतात लॉक डाऊन पुन्हा लागणार का?

चीन कोरोनातअपयशी,मृतदेहांचा खच, मृत्यूची आकडेवारी गोळा करणेही बंद.

जागतिक वृत्त-तीन वर्षे लॉकडाऊनच्या आधारे कोरोना रोखण्याच्या धोरणावर चालणाऱ्या चीनचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. लॉकडाऊन उघडताच रुग्णालयांत मृतदेहांचे ढीग लागत आहेत. संसर्गाच्या या स्फोटामागे ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट बीएफ.७ आहे. भारतातही तो आढळत होता. बीजिंगच्या जियोथाँगशन मेडिकल रिसर्च सेंटरचे तज्ज्ञ डॉ. ली थोंग्जेंग सांगतात, हा व्हेरिएंट लसीद्वारे तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देत आहे. मात्र, आधी संसर्ग झालेल्या लोकांना धोका नाही. त्यांना संसर्ग होत असला तरी ते आजारी होताना दिसत नाहीत. ज्या लोकांमध्ये संसर्गाच्या माध्यमातून नैसर्गिक प्रतिकारशक्ती आली आहे त्यांना कोणताच धोका नाही. मात्र, समस्या ही आहे की, असे लोक चीनमध्ये केवळ १५% आहेत. तथापि, भारतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, गेल्या एक वर्षात जेव्हा जेव्हा देशात सर्वेक्षण झाले तेव्हा ९५% लोकांमध्ये अँटीबॉडीज असल्याचे आढळले आहे. म्हणजे त्यांना कधी ना कधी संसर्ग झालेला आहे. अशा वेळी भारतात संसर्गाचा धोका सध्यातरी दिसत नाही. मात्र, या व्हेरिएंटने म्यूटेट होऊन स्वरूप बदलले तर धोका होऊ शकतो. चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत याचे धोकादायक रूप म्यूटेट झाल्याचे वृत्त आले नाही.

     काँग्रेसने यात्रा थांबवावी : केंद्र

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्र लिहिले- ‘लस घेणारे लोकच भारत जोडो यात्रेत सहभागी होतील, हे काँग्रेसने निश्चित करावे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसाल तर यात्रा थांबवा. उत्तरात काँग्रेस म्हणाली, मोदींनी गुजरात निवडणुकीत प्रोटोकॉलचे पालन केले होते का? यात्रा श्रीनगरात तिरंगा फडकवल्यानंतरच थांबेल.

     सर्व्हे : ७०% भारतीयांना वाटते- चीनहून येणारी उड्डाणे रोखावी

स्थानिक मंडळाच्या सर्व्हेनुसार, चीनच्या विमान प्रवासावर तत्काळ बंदी घातली पाहिजे, असे ७०% भारतीयांचे म्हणणे आहे. देशातील ३०१ जिल्ह्यांतील १० हजार लोकांवर झालेल्या या सर्व्हेमध्ये १६% लोक म्हणाले, बंदी घातली नाही तर प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवालासह प्रवेश दिला पाहिजे. केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की, चीनमधील सक्रिय बीएफ.७ व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतातही आढळले आहेत. ३ गुजरात आणि १ ओडिशामध्ये आढळला आहे.

     भारतात ६०% लोकांना बूस्टर, हायब्रिड इम्युनिटीही आली; पण सावधगिरी गरजेची

एक्स्पर्ट- डॉ. रामशंकर उपाध्याय, हाॅर्वर्ड मेडिकल स्कूल, ह्यूस्टन

{भारतात धोका नसण्याचा आधार काय आहे?

भारतात ९०% लोकांनी लस घेतली. १८ वर्षांवरील ६०% लोकांनी बूस्टर डोसही घेतला. संसर्गामुळे ७०% लोकांनी हायब्रिड इम्युनिटी मिळवली. चीनमध्ये असे नाही. तिथे अद्याप पहिलीच लाट सुरू आहे. भारतात अशा तीन लाटा आल्या. त्यामुळे भारतात सध्या धोका नाही.

      पण मास्क घालणे सुरू करा असे सरकार म्हणत आहे

मास्क केवळ सावधगिरीसाठी आहे. व्हायरससाठी प्रत्येक व्यक्तीचे शरीर एक प्रयोगशाळा असते.तो प्रत्येक वेळी म्यूटंट होतो. त्यामुळे सावधगिरी महत्त्वाची.

     केंद्राचे महत्त्वाचे निर्णय

{विदेशातून आल्यास रँडम सँपलिंग. राज्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती लागू करण्याचा विचार करावा.

{ ज्या भागांत नवे रुग्ण अधिक असतील, ते क्लस्टर बनतील. आयसोलेशन वाढेल.

{विदेशातून येणाऱ्या लोकांसाठी काय प्रोटोकॉल असला पाहिजे, याचा अहवाल तज्ज्ञांची टीम दोन दिवसांत देईल.

{धोका नाही, लॉकडाऊन नाही.

     महाराष्ट्र : पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत ३० टक्क्यांची घट

महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०% घटली आहे. नगर, जळगाव, अकोला व पुण्यात पॉझिटिव्हिटी दर एक टक्का आहे. सध्या राज्यात कोरोनाचे १३५ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात ३० नवे रुग्ण आढळले, मात्र एकही मृत्यू झालेला नाही.

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 20 डिसेंबर रोजी देशात कोरोनाचे 131 नवे रुग्ण आढळले. तर देशभरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3408 इतकी आहे. तर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 20 डिसेंबर रोजी देशभरात कोरोनाच्या 1 लाख 15 हजार 734 चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात कोरोनाचे 4 कोटी 46 लाख 76 हजार 330 रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी 4 कोटी 41 लाख 42 हजार 242 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 680 जणांचा मृत्यू झाला आहे.

     राज्यात 132 सक्रीय रुग्ण 

     महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, राज्यात सध्या कोरोनाचे 132 सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 81 लाख 36 हजार 386 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 79 लाख 87 हजार 824 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे राज्यात 1 लाख 48 हजार 412 जणांचा मृत्यू झाला आहे.

    सध्याची आकडेवारी पाहता देशात आणि राज्यातही कोरोना प्रसाराचा वेग बराच कमी आहे. पण तरिही चीनमधील नव्या व्हेरिएंटच्या प्रसाराचा धोका पाहता देशातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली आहे.

    भारतात 834 लोकांमागे एक डॉक्टर 

     जून 2022 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, देशात 13.08 लाखांहून अधिक अॅलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. याशिवाय 5.64 लाख आयुष डॉक्टर्स आहे. यानुसार देशात 834 लोकांमागे एक डॉक्टर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार हजार लोकांमागे एक डॉक्टर असायला हवा. याशिवाय सरकारने गेल्या वर्षी संसदेत दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2021 पर्यंत देशभरात एक कोटीपेक्षाही जास्त आरोग्य कर्मचारी होती. यात डॉक्टर, नर्सेस, आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.