मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामी यांचे निधन : पूजेला बसताना आला हृदयविकाराचा झटका; रुद्रपठणाची तयारी सुरू असतानाच कोसळले
मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामी यांचे निधन : पूजेला बसताना आला हृदयविकाराचा झटका; रुद्रपठणाची तयारी सुरू असतानाच कोसळले
लेवाजगत न्यूज सोलापूर -दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील मठाचे मठाधीश श्री ष. ब्र. रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी ( वय 65 )यांचे शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान अश्विनी रुग्णालयात निधन झाले.
श्री. रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पूजेसाठी बसत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. यावेळी त्यांचे बंधू संगमनाथ हिरेमठ आणि इतरांनी त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात हलविले. यावेळी उपचारादरम्यानच रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजी हे लिंगैक्य झाले. त्यांच्या लिंगैक्यामुळे वीरशैव लिंगायत समाजासह इतर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
लिंगायत समाजातील धर्मगुरू म्हणून रेणुक शिवाचार्य महास्वामींची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल काशी पिठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी शोक व्यक्त केला. वीरशैव संप्रदाय पुढे नेण्यासाठी रेणुक शिवाचार्य महास्वामीचे मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने त्या संप्रदायाची मोठी हानी झाली, असे ते म्हणाले.
महास्वामीजी दररोज मठातील पूजेसाठी बसत असतात. शुक्रवारी वेळ अमावस्या म्हणून ते पहाटेच उठलेले होते. स्नान उरकून धार्मिक विधी पूर्ण केल्या. त्यानंतर महादेवाच्या रुद्रपठणाची तयारी सुरू केली होती. त्यासाठी उठून ते उभे राहिले आणि उभ्या उभ्याच कोसळले. मठातील त्यांचे बंधू आणि इतर शिष्यगण मदतीसाठी धावून आले. मंद्रुप येथून सोलापूर शहरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात त्यांना आणले. तातडीच्या वैद्यकीय सेवेत त्यांच्या काही चाचण्या घेऊन निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मंद्रुप येतील मठात नेण्यात आला. त्यांना समाधी देण्यासाठी शिष्यगण आणि भक्तांनी तयारी सुरू केली. त्यासाठी कर्नाटकातून आणखीन काही साधक सोलापूरला येणार असल्याचे सांगण्यात आले.
रेणुक शिवाचार्य महास्वामीचा संप्रदाय खूप मोठा आहे. त्यांचे अनुयायी शेजारच्या कर्नाटक प्रांतातील आळंद, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर, बंगळूरपर्यंत आहेत. श्रावणातील अनुष्ठान सोहळ्यासाठी कर्नाटकातून भक्तमंडळी मंद्रुप येथील मठात येत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत