Header Ads

Header ADS

संभाजीनगरच्या सभेतून जे पी नड्डा फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग; दौराही ठरला

 

संभाजीनगरच्या सभेतून जे पी नड्डा फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग; दौराही ठरला

लेवाजगत न्युज संभाजीनगर:- गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच, या निवडणुकीचे रणशिंग संभाजीनगरातून फुंकले जाणार आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) 2 जानेवारी रोजी संभाजीनगर मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी 5 वाजता सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याच मैदानात आपल्या सभा गाजवल्या होत्या आता तिथेच जे पी नड्डा यांची सभा होणार आहे. तर या सभेत भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.


 असा असणार नड्डा यांचा दौरा


2 जानेवारीला नड्डा यांचे औरंगाबादमध्ये आगमन होणार.

2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता नड्डा हे वेरुळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. 

त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होईल

सभेनंतर नड्डा हे वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तिन्ही मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची बैठक नड्डा घेतील. 

त्यानंतर शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करतील. 

त्यांच्या या सभेला सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वच महत्वाचे नेते  उपस्थित राहतील.

अवघ्या पाच दिवसांत सभेचं नियोजन!

जे पी नड्डा यांचा दौरा मंगळवारी (27 नोव्हेंबर) रात्री जाहीर झाला. त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांकडे सभेची तयारी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. एवढ्या कमी वेळेत सभेची तयारी करणं भाजप नेत्यांसमोर आव्हान असणार आहे. तर सभेचे नियोजन करताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. सोबतच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात गर्दी जमवताना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहे.

संभाजीनगर मतदारसंघ भाजप लढवणार!

प्रत्येकवेळी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाकडे लोकसभा लढवण्यासाठी सक्षम नेता सध्यातरी नाही. त्यातच भाजप नेत्यांकडून सतत संभाजीनगर लोकसभा लढवण्याचा उल्लेख केला जात आहे. एवढेच नाही तर यावेळी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याचे दावे देखील अनेकदा भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.